... आणि मिळालं २४ तास मूबलक पाणी

संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं असताना बदलापूरमधल्या शिवदर्शन सोसायटीतल्या रहिवाशांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ शकलं... याचं श्रेय द्यावं लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंगला आणि बदलापूर नगरपालिकेला...

Updated: Jun 6, 2012, 06:48 PM IST

 www.24taas.com,  बदलापूर

 

संपूर्ण महाराष्ट्रात पाणीप्रश्नानं गंभीर रुप धारण केलं असताना बदलापूरमधल्या शिवदर्शन सोसायटीतल्या रहिवाशांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ शकलं... याचं श्रेय द्यावं लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंगला आणि बदलापूर नगरपालिकेला...

 

बदलापूरमधील शिवदर्शन सोसायटीत तब्बल ३६ इमारतींचा समावेश होतो. आणि आता तर २४ तास पाणी उपलब्ध असणारी सोसायटी म्हणून या सोसायटीनं नावलौकीक मिळवलाय. संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळ्यात पाणीप्रश्नानं गंभीर रुप धारण केलेलं असताना इथं २४ तास मुबलक पाणी कसं मिळू शकतं, याप्रश्नानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, यामागे होती ती सात वर्षांची मेहनत... बदलापूर नगरपालिकेच्या वतीनं ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रकल्प राबवून शिवदर्शन सोसाययीनं आपला पाणी प्रश्न कायमचा मिटवलाय.

 

पावसाळ्यात इथल्या ३६ इमारतींच्या छतावर आणि जमिनीवर पडणारं पावसाचं पाणी जमिनीत मुरवल्याने इथल्या भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. हे पाणी सोसायटीच्या मध्यवर्ती भागात ३ मोठ्या बोअरवेलमध्ये साठवण्यात आलं. सोसायटीतल्या मीनाताई ठाकरे उद्यानात तयार करण्यात आलेल्या टाक्यांमधील पाणी एकाच पंपाद्वारे सर्व इमारतींना चढवलं गेलं. त्यामुळे पैशांसोबत विजेचीही बचत झाली. इतकंच नाही तर, यामुळे इथल्या प्रत्येक इमारतीला दररोज अडीच लाख लिटर पाणी उपलब्ध करून देणंही शक्य झालंय. आता, मीनाताई ठाकरे उद्यानंही सदाहरित झालंय. या उपक्रमामुळेच पूरस्थितीवर मात करण्यात यश आलंय. शिवदर्शन सोसायटीनं पाणीटंचाईवरचा रामबाण उपाय प्रत्यक्षात आणून एक आदर्शच उभा केलाय.

 

.