चोरटे समजून तिघांची केली हत्या

नागपुरात चोर समजून तिघांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भरतवाडा परिसरात ही घटना घडली. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच तीन जण भरतवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत होते.

Updated: May 9, 2012, 01:20 PM IST

www.24taas.com, नागपूर

 

 

नागपुरात चोर समजून तिघांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भरतवाडा परिसरात ही घटना घडली. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच तीन जण भरतवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत होते.

 

 

स्थानिकांना त्यांचा संशय़ आल्यानं त्यांनी त्याना हटकलं यावेळी घाबरून या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावानं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. चोर पकडल्याची माहिती समजताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र हजार लोकांच्या जमावापुढं त्यांचं काहीही चाललं नाही. जमावानं या तिघांची दगडानं ठेचून हत्या केली.  हे तिघे चोरटे असल्याचे समजून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  बुधवारी सकाळी या तिघांचे मृतदेह मिळाले आहेत.

 

 

या भागात गेल्या काही दिवसांत चोरी आणि महिलांची छेडछाड करण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. मंगळवारी रात्री हे तिघेजण महिलांची छेडछाड करताना आढळून आल्यानंतर नागरिकांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. आज सकाळी नऊच्या सुमारास या तिघांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.