www.24taas.com, नाशिक
नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक आज होत आहे. सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या मनसेनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपनंही मनसेला साथ देण्याचं ठरवलं आहे. मात्र शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे नवा महापौर कोणत्या पक्षाचा होणार याचा सस्पेन्स वाढला आहे.
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. महापौरपदासाठी ११ तर उपमहापौरपदासाठी ९ जणांनी अर्ज भरले आहेत. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या मनसेनं सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मनसेसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि माकपनंही आपापले उमेदवार महापौरपदासाठी रिंगणात उतरवलेत. मात्र सत्येचं समीकरण नक्की होत नसल्याने प्रमुख पक्षांमध्ये दावेदारीसाठी लॉबिंग सुरु आहे. दुसरीकडे भाजपनं मदतीचे संकेत दिल्याने नाशिकमध्ये मनसेच्या नेत्यांचे हौसले बुलंद आहेत.
भाजपनं मनसे साथ देण्याचं ठरवलं असलं तरी शिवसेनेची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे मातोश्रीच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट होईल असा विश्वास स्थानिक शिवसैनिक व्यक्त करत आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतलीय. कडेकोट बंदोबस्त ठेवत तडीपार आणि इतर गुन्हेगारांची शोध मोहिम पोलिसांनी सुरु केली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पळवापळवीचा प्रकार टाळण्यासाठी अज्ञातवासात गेलेले नगरसेवक परतीच्या वाटेवर आहेत. हे सर्वजण थेट मतदानाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतरच नाशिकचा नवा महापौर कोण यावरील पडदा उठणार आहे.