अखेर ऊसदराचा तिढा सुटला, कोल्हापूर विभागात 2050 रू. पुणे विभागासाठी 1850 तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रू. दर निश्चित करण्यात आला आहे. लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सांगितलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आलं आहे. गेल्या काही दिवसात या आंदोलनाने तीव्र स्वरुप धारण केलं होतं. राजू शेट्टींनी आणि शेतकरी संघटेनेच्या नेत्यांनी काल चर्चा फिस्कटल्या नंतर आजची मुदत दिली होती आणि तोडगा त्वरीत काढण्याचा इशारा दिला होता.
आज दिवसभरात आंदोलनाला हिंसक वळण लागलं, सांगलीत पोलिसांनी शेतकरी निर्दशकांवर लाठीमार केला, तर अहमदनगर आणि राज्यभरात अनेक ठिकाणी रास्तारोक, टायर जाळणे यासारखे प्रकार झाले. काल साखर संकुलातील बैठकीत तोडगा निघु शकला नव्हता. आज राजू शेट्टींच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता आणि दोन वेळा चर्चा फिस्कटली होती. या आंदोलनाला मनसेनेही पाठिंबा जाहीर केला होता.