कैलास पुरी, www.24taas.com, पुणे
पिंपरी चिंचवड मनपाच्या निवडणुका होवून दोन महिने उलटले तरी पिंपरीतील राजकीय वातावरण अजूनही तापलेलंच आहे. महपौर पद, स्थायी समिती, शिक्षण मंडळ निवडणुका झाल्यानंतर आता शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वीकृत सदस्य होण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झालीय.
पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसनं निर्विवाद वर्चस्व मिळवूनही अजित दादांसमोरची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये तीन आमदार आणि शहराध्यक्ष आझम पानसरेंच्या आपसातील संघर्ष अजित दादांना डोकेदुखीच ठरतेय. शिक्षण मंडळ निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्य निवडीवरून पुन्हा संघर्ष पेटलाय. शहराध्यक्ष आझम पानसरेंनी त्यांचा मुलगा निहाल पानसरेला राजकारणात आणण्यासाठी ही संधी निवडलीय. त्यासाठी थेट अजित पवारांना साकडं घातलंय.
एवढंच नाही तर आझम पानसरेंनी त्यासाठी स्वत:चं पद सोडण्याची तयारीही दर्शवलीय. वरकरणी ते इतराना संधी मिळावी यासाठी दुसरा शहराध्यक्ष करा अशी विनंती करत असले तरी मुलाला स्वीकृत सदस्य करा मी पद सोडतो अशी भूमिका त्यांनी घेतल्याची जोरदार चर्चा आहे.
आझम पानसरेंप्रमाणंच आमदार लक्ष्मण जगताप, अन्ना बनसोडे, विलास लांडेंनीही त्यांचे समर्थक स्वीकृत पदावर जावेत यासाठी मोर्चे बांधणी केली आहे. दादांचा पिंपरी चिंचवड वर वचक असला तरी तो या सुभेदारांच्या जीवावरच. त्यामुळे आझम पानसरेंच्या मुलाला दादा स्वीकृत पद भेट देतात की कात्रजचा घाट दाखावतात यावर पिंपरीतलं पुढचं राजकारण बदलणार आहे.