महावितरणचा पुण्यातला गैरकारभार

महावितरणचा पुण्यातला गैरकारभार समोर आला आहे. पुण्यातल्या वीज ग्राहकांकडे महावितरणचे ४५ कोटी थकलेत. माहितीच्या अधिकारातून ही गोष्ट उघड झाली आहे. थकबाकीमध्येही नंबर वन होण्याची किमया पुणे झोननंच केली, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

Updated: Jan 5, 2012, 11:35 PM IST

www.24taas,com, पुणे

 

महावितरणचा पुण्यातला गैरकारभार समोर आला आहे. पुण्यातल्या वीज ग्राहकांकडे महावितरणचे ४५ कोटी थकलेत. माहितीच्या अधिकारातून ही गोष्ट उघड झाली आहे. बड्या लोकांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करणारं महावितरण सामान्य माणसाचं वीज बिल थकलं की लगेच कनेक्शन तोडतं. हा अन्याय का, असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.  महावितरणच्या सर्वोत्कृष्ट झोनचा पुरस्कार पुणे झोनला मिळाला आहे. पण थकबाकीमध्येही नंबर वन होण्याची किमया पुणे झोननंच केली, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

 

पुण्यामध्ये १२ हजार ६८१ वीज ग्राहकांनी महावितरणचे तब्बल ४५ कोटी २ लाख रुपये थकवलेत. यापैकी ११ हजार ९२७ ग्राहकांनी पंचवीस हजारांपेक्षा जास्त रक्कम थकवली आहेत. तर ५४५ व्यावसायिक ग्राहकांची थकबाकी पन्नास हजारांच्या घरात आहे. तर एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या औद्योगिक ग्राहकांची संख्या२०९ इतकी आहे.  महावितरणनं दिलेल्या माहितीतूनच ही बाब समोर आली आहे.

 

ही थकबाकी किमान ६ महिन्यांपेक्षा जास्त काळाची आहे. म्हणजेच ही थकबाकी साचत असतानाच महावितरणनं त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं. दुसरीकडे सामान्य ग्राहकांचं दोन महिन्यांचं बिल जरी थकलं, तरी लगेचच महावितरण कनेक्शन कापून टाकतं. मग या बड्या थकबाकीदारांना बेड्या का नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहेत.यासंदर्भात सजग नागरिक मंच राज्य वीज नियामक आयोगाकडे दाद मागणार आहे. महावितरणला फक्त बड्या थकबाकीदारांची घरं उजळायची आहेत का, असा संशय घ्यायला नक्कीच जागा आहे.