असं उभाराल ‘मडकं सिंचन’...

अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पद्धती आणि पर्यावरण विभागानं एका अतिशय साध्या आणि कमी खर्चाच्या पद्धतीतून गेल्या दहा वर्षात १०० एकरातील ३०००हून अधिक झाडांना जिवदान देत त्यांना मोठं केलंय.

Updated: Jun 22, 2012, 09:53 AM IST

www.24taas.com, अकोला  

 

अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पद्धती आणि पर्यावरण विभागानं एका अतिशय साध्या आणि कमी खर्चाच्या पद्धतीतून गेल्या दहा वर्षात १०० एकरातील ३०००हून अधिक झाडांना जिवदान देत त्यांना मोठं केलंय. ५००० लिटर पाण्यात एक हेक्टर क्षेत्रावरील झाडे या पद्धतीनं वाचवता येऊ शकतात, असा दावा ही कृषी विद्यापिठानं केलाय.

 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी पद्धती आणि पर्यावरण केंद्राच्या प्रक्षेत्रावर झाडांच्या बुंध्याशी अगदी रांगेत ही सर्व मडकी झाडांना वाचविण्यासाठी ठेवली आहेत. उन्हाळ्यात अगदी कमीत कमी पाण्यात माठाच्या सहायाने झाडांना वाचविण्याची ही पद्धत अतिशय स्वस्त आणि सोपी अशी आहे. या पद्धतीत माठाशिवाय लागतं ते सहज उपलब्ध होणारं टाकाऊ कापड, आणि गवत. त्यामुळे जेवढी झाडांची संख्या तेवढाच खर्च मडक्यांसाठी येतो. आठवड्यातून एकदा का झाडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माठात पाणीटाकलं की आठवडाभर झाडासाठी पाणी देण्याची गरज पडत नाही.  झाडाला माठाच्या सहाय्यानं वाचविण्यासाठी विशिष्ट अंतरावर खड्डा खोदावा, नंतर त्यामध्ये चुना लावलेला माठ गाडवा, त्या माठाला एक मिली मीटरच्या ड्रील मशिननं छिद्र पाडून पाणी झिरपण्यासाठी कापडाची वात करावी.

 

यापद्धतीचा वापर करून फक्त २४ ड्रम पाण्यात एक हेक्टर क्षेत्रातील झाडांना वाचवता येवू शकतं. साधारणतः एका पाच लिटर क्षमतेच्या माठाच्या सहायाने दिलेल्या पाच लिटर पाण्यात एक झाड आठवडाभर राहू शकते. साधारणतः सहा बाय सहा एवढ्या अंतरावर झाडांची लागवड झाली असेल तर एक हेक्टर क्षेत्रात साधारणतः २५० झाडे राहतील. या पद्धतीन माठामध्ये आठवड्यातून एकदा पाणी टाकणं वश्यक आहे. म्हणजेच ५००० लिटर पाण्यात तुम्ही तुमच्या एका हेक्टर क्षेत्रावरील झाडं या पद्धतीनं वाचवू शकता. या विभागानं या पद्धतीचा वापर करून आपल्या १०० एकर प्रक्षेत्रावरील जवळपास तीन हजारांवर झाडांना जीवदान दिलं जातयं. आज ही झाडं मोठी होऊन डौलानं उभी आहेत

 

अकोल्याच्या कृषी विद्यापीठानं अवलंबिलेला हा साधा-सरळ आणि कमी पैशांचा या पद्धतीचा उपयोग केला तर झाडांच्या रूपानं खूप मोठी वनसंपदा वाचविली जाऊ शकते, यात शंकाच नाही.

 

.