www.24taas.com, सातारा
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यातील फलटण इथं प्रस्थान करणार आहे.
लोणंदचा निरोप घेतल्यानंतर माऊलीच्या पालखीची वाटचाल चांदोबाचे लिंब गावाच्या दिशेने सुरू झाली. गुरुवारी साताऱ्यातील ‘चांदोबाचा लिंब’ या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण सोहळा पार पडला... रिंगण म्हणजे वारी सोहळ्यातील विसावा… वारीचा प्रवास अधिक सुखकारक आणि आनंदी व्हावा यासाठी रिंगणाचं आयोजन केलं जातं. वारकरी वेगवेगळे खेळ खेळून, विठूनामाचा जयघोष करत या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतात. या सोहळ्यानंतर माऊलींच्या पालखीनं तरडगाव इथं रात्री विश्रांती घेतली.
दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी काल बेलवडीतल्या गोलरिंगणानंतर अंथुर्णे मुक्कामी होती. आज पालखी निमगाव केतकीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. संत निवृत्तीनाथाची पालखी आज अहमदनगर जिल्ह्यात कोरेगावहून पुढे प्रस्थान करेल.