www.24taas.com, खार्किव
युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री 'ब' गटातील संघांमध्ये साखळीतील सामन्यांत जर्मनी आणि पोर्तुगाल संघांनी विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या जर्मनी आणि पोर्तुगालचे सामने 'अ' गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या ग्रीस आणि चेक प्रजासत्ताक संघांशी लढत होणार आहे. शुक्रवारी जर्मनीची ग्रीसशी आणि गुरुवारी पोर्तुगालची चेक प्रजासत्ताकशी लढत होणार आहे.
पोर्तुगालने बलाढ्य नेदरलँडचा २-१ असा पराभव केला. तर जर्मनीनेही डेन्मार्कचा २-१ असा पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात हिरो ठरला तो ख्रिस्तियानो रोनाल्डो. त्याने पोर्तुगालसाठी दोन गोल केले.
दुसऱ्या हाफमध्ये रोनाल्डोने ७४ व्या मिनिटाला नानीने दिलेल्या पासवर गोल करत संघासाठी विजयी आणि निर्णायक गोल केला. या पराभवामुळे युरो करंडक स्पर्धेतून नेदरलँडवर १९८० नंतर प्रथमच साखळी फेरीतून बाहेर पडावे लागले.
दुसऱ्या सामन्यात जर्मनीने डेन्मार्कचा २-१ असा पराभव केला. आपला १०० वा सामना खेळणाऱ्या जर्मनीच्या लुकास पोडोल्स्की याने पहिला गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. मात्र, काही मिनिटातच डेन्मार्कच्या मायकल कोहर्म-देहली याने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. अखेर जर्मनीच्या लार्स बेंडर याने संघासाठी निर्णायक गोल करत संघाला विजय मिळवून दिला.