www.24taas.com, नवी दिल्ली
माजी भारतीय कॅप्टन राहुल गांगुलीच्या मते राहुल द्रविडने इंग्लंडविरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये केलेल्या शानदार कामगिरीनंतरच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करायला हवी होती. त्यामुळे आता द्रविडने केलेल्या निवृत्तीच्या घोषणेने गांगुलीला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.
गांगुलीने शुक्रवारी फिरोजशाह कोटला मैदानावर पत्रकारांशी बोलताना म्हटलं, “मला वाटतं, द्रविडने इंग्लंड दौऱ्यानंतर ताबडतोब निवृत्ती घ्यायला हवी होती. पण, द्रविडने जो आत्ता निवृत्तीचा निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे.” गांगुली म्हणाला की, द्रविडचा निर्णय हा सिलेक्टर्सना दिलेला संकेत आहे की आता टीम इंडियात बदल करण्याची गरज आहे. टीम इंडिया परदेशात ८ टेस्ट मॅचेस हारलेली आहे आणि हा ही निशचितच चिंतेची बाब आहे.
गांगुली कॅप्टन असताना द्रविडने कित्येक अविस्मरणिय मॅचेस खेळल्या होत्या.द्रविडने खेळलेली सर्वोत्कृष्ट खेळी कुठली या प्रश्नावर गांगलीने उत्तर दिले, कोलकात्यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या मॅचमध्ये केलेल्या १८० रन्स हा त्याचा सर्वोत्तम खेळ होता. तसंच हेडिंग्लेमध्ये केलेल्या १४८ रन्सची खेळीही अप्रतिम होती. द्रविड जेव्हा पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला, तेव्हा भारतीय क्रिकेटला परिवर्तनाची गरज होती आणि आज जेव्हा द्रविड क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, तेव्हाही भारतीय टीमला परिवर्तनाचीच आवश्यकता आहे.