धर्मशाळेत पंजाबने चेन्नईचा गाशा गुंडाळला

पंजाब किंग्ज इलेव्हनने चेन्नई सुपरकिंग्जचा ६ गडी आणि तब्बल २१ चेंडू राखून पराभव करत प्ले ऑफमध्ये चेन्नई पोहचण्याच्या शक्यता जवळपास नाहीशी केली आहे. पंजाबचा कर्णधार गिलख्रिस्टने एक बाजू लावून धरीत नाबाद ६४ धावाची खेळी करीत विजयी खेचून आणला. या विजयाने पंजाबचे आता १६ गुण झाले असून त्यांचा शेवटचा सामना शनिवारी दिल्लीशी होणार आहे.

Updated: May 17, 2012, 08:28 PM IST

www.24taas.com, धर्मशाळा

पंजाब किंग्ज इलेव्हनने चेन्नई सुपरकिंग्जचा ६ गडी आणि तब्बल २१ चेंडू राखून पराभव करत प्ले ऑफमध्ये चेन्नई पोहचण्याच्या शक्यता जवळपास नाहीशी केली आहे. पंजाबचा कर्णधार गिलख्रिस्टने एक बाजू लावून धरीत नाबाद ६४ धावाची खेळी करीत विजयी खेचून आणला. या विजयाने पंजाबचे आता १६ गुण झाले असून त्यांचा शेवटचा सामना शनिवारी दिल्लीशी होणार आहे.

चेन्नईने पंजाबपुढे केवळ १२१ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली होती. कर्णधार गिलख्रिस्ट आणि मनदीप सिंग यांनी आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र मनदीप सिंग २४ धावांवर बाद झाला. त्याने २१ चेंडूत पाच चौकारासह २४ धावा केल्या. त्याला ऍल्बी मॉर्केलने त्रिफळाचित केले.

मनदीप बाद झाल्यानंतर नितीन सैनीही केवळ १ धावेवर बाद झाला. त्याला ब्रॉव्होने धोनीकरवी झेलबाद केले. डेव्हिड हसीही एक षटकारासह ९ धावावर बाद झाला. त्यालाही ब्रॉव्होने धोनीद्वारे झेलबाद केले. त्यानंतर गिलख्रिस्टने धावा वेगाने काढण्यास सुरुवात केली. त्याने सिद्धार्थ चिटणीस आणि अझर मेहमूदला सोबत घेत संघाचा विजय साकार केला.

ड्वेन ब्रॉव्होने दोन गडी बाद केले. मात्र त्याची अष्टपैलू कामगिरी संघाला विजयी करु शकली नाही.

धर्मशाळा येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने निर्धारित २० षटकात ७ बाद १२० धावा केल्या. चेन्नईकडून ड्वेन ब्रॉव्हो याने सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याने ४३ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारासह ४८ धावा काढल्या. मात्र अर्धशतक झळकवण्यास तो अपयशी ठरला.