www.24taas.com, मीरपूर
सचिन तब्बल एक वर्षापासून ९९च्या फेऱ्यात फसला होता.नागपूरला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिननं ९९ वी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर १३ मार्च २०११पासून सुरू झालेली महासेंच्युरीची अखेर प्रतिक्षा आज संपली.
१२ मार्च २०११ रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका याच मॅचमध्ये मास्टर ब्लास्टरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९९ वी सेंच्युरी ठोकली. वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सचिननं धडाकेबाज बॅटिंग केली. नागपूरच्या जामठा मैदानावर सचिननं ८ फोर आणि ३ सिक्सच्या जोरावर १११ रन्सची तुफानी खेळी केली.त्याच्या लाजवाब बॅटिंगनं सर्वांचीच मनं जिंकली. मात्र नागूपरमधील या सेंच्युरीनंतर सचिन ९९च्या फेऱ्यातच अडकला होता.
सचिनला महासेंच्युरीपासून रोखण्यास श्रीलंका,पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजच्या टीम यशस्वी ठरल्या होत्या. मुंबईत घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये तर सचिनची सेंच्युरी केवळ ६ रन्सनी हुकली, तर ओव्हलला इंग्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये महासेंच्युरी ९ रन्सनी दूर राहिली.गेल्या तब्बल ३२ इनिंग्समध्ये सचिनला महासेंच्युरीनं हुलकावणी दिल्यानं त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली होती. आता आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्पात सचिनची महासेंच्युरी प्रतिक्षा संपावी अशीच इच्छा त्याचे चाहते करत होते.
अखेर, आज तो योग आला. शंभरावं शतक सचिनपासून दूर राहूच शकलं नाही आणि आज सचिनने महासेंच्युरी झळकावली.