www.24taas.com, हैदराबाद
हैदराबाद साखळी बॉम्बस्फोटांमागे पुणे बॉम्बस्फोटांचा सूत्रधार यासीन भटकळचाच हात असल्याचं तपासात आता स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र एटीएसनं ज्या चार दहशतवाद्यावंर प्रत्येकी दहा लाख रुपयांचं बक्षिस घोषित केलं होतं. त्यांनीच हे बॉम्बस्फोट घडवल्याचंही समोर येत आहे.
यासीन भटकळ... देशातल्या अनेक दहशतवादी कारवायांमागे असलेलं हे नाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. देशात इंडियन मुजाहिदद्दीनचा म्होरक्या आणि पुणे बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेल्या, यानिनचं हैद्राबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून १६ जणांचे निष्पाप बळी घेतल्याचं पोलीस तपासात पुढे येत आहे. यासीननं हैदराबादमध्ये आपल्या तीन साथीदारांच्या मदतीनं बॉम्बस्फोट घडवल्याचंही समोर येत आहे. त्याचे हे तीन साथीदार आहेत तेहसीन, असादतुल्ला आणि वकास. याच चौघांनी मिळून हैद्राबादेत बॉम्बस्फोट घडवल्याच्या निष्कर्षावर सर्वच तपास यंत्रणा पोहचल्या आहेत.
पुण्यात सायकलवर बॉम्बस्फोट करण्याचा या चौघांचा प्रयत्न फसल्यानंतर, या चौघांनी आपला मोर्चा हैद्राबादच्या दिशेने वळवला होता. सय्यद मकबूलनं इमरानच्या मदतीनं हैद्राबादमधील दिलसुखनगर, बेगम बाजार आणि एबिड्सस या परिसराची रेकी करुन त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करुन यासीन भटकळच्या हवाली केले होते. आणि त्याच व्हिडिओच्या आधारावर यासीनने हैद्राबादमध्ये साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचला.
तपास यंत्राणांना घटनास्थळावरुन जे सीसीटिव्ही फ़ुटेज मिळाले आहे त्यात, दिलसुखनगर येथे बॅग लटकवलेली सायकल घेऊन येणार तरुण हा यासीन भटकळच होता, या निष्कर्षावर तपास यंत्राणा पोहोचल्या आहेत. यासीन भटकळला जेरबंद करण्यासाठी आता तपास यंत्राणांनी कंबर कसली आहे. एवंढचं नाहीतर यासाठी अमेरीका, फ्रान्स आणि लंडन या देशांची मदतही घेतली जात आहे.