www.24taas.com, मुंबई
अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होतेय. या बैठकीच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली होती. मंत्रिमंडळाबाहेर राहून सरकार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याचा आणि सत्तेबाहेर राहून सत्ता राबवण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय.
अजित पवार आता रिमोट कंट्रोलची भूमिका बजावणार आहेत. सरकार बाहेर राहून सरकार चालवण्याचा त्यांचा प्रयत्न स्पष्ट यावेळी दिसून आला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर आपलंच वर्चस्व त्यांनी दाखवून दिलंय. मंत्रिमंडळ बैठकीच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक घेतली. राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचं राष्ट्रवादी पक्ष आणि सरकारमधलं स्थान कसं असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, मंत्र्यांची बैठक बोलावून अजित पवारांनी पक्षावर आपलं वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी मात्र अशा चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलंय.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत काँग्रेसविरोधात आक्रमक राहण्याची रणनीती आखण्यात आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळं आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.