आम्ही आशा सोडलेली नाही - उद्धव ठाकरे

रात्री उशीरा दोन वाजल्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या प्रवेशद्वाराशी येऊन शिवसैनिकांशी संवाद साधलाय. आम्ही आशा ठेवलीय, तुम्हीसुद्धा आशा कायम ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 15, 2012, 02:30 AM IST

www.24taas.com, मुंबई
रात्री उशीरा दोन वाजल्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या प्रवेशद्वाराशी येऊन शिवसैनिकांशी संवाद साधलाय. आम्ही आशा ठेवलीय, तुम्हीसुद्धा आशा कायम ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय.
कलानगरच्या प्रवेशद्वारापाशी रात्री उशीरापर्यंत गर्दी कायम आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांसमोर येण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हाही कलानगरच्या गेटपाशी उपस्थित होता. ‘माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे, बाळासाहेब यातून नक्की बाहेर येतील... बाळासाहेबांची इच्छाशक्ती दांडगी आहे, या इच्छाशक्तीच्या आणि तुमच्या प्रार्थनेच्या बळावर संकटावर मात करू... पण शांतता आणि संयम राखा आणि मातोश्रीचं नाव खराब होणार नाही याची दक्षता घ्या’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या आवाहनानंतर गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा शिवसैनिकांमधून उमटल्या.

सध्या, मातोश्रीवर झालेली गर्दी खूप काही सांगून जातेय. शिवसैनिक आणि बाळासाहेबांचं घट्टं नातं इथं स्पष्टपणे दिसून येतंय. हजारो शिवसैनिकांसोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, रामदास आठवले हेही मातोश्रीवर दाखल झालेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत.
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, संजय दत्त, मान्यता दत्त हेही मातोश्रीवर उपस्थित झालेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्री बाहेर पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीत बिघडली आहे. मातोश्रीवरच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. जलाल पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा चमू बाळासाहेबांवर उपचार करत आहेत. बाळासाहेबांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत.