अजित पवार : निवडणुका आणि विरोधक

मुंबई पुणे नाशिक या शहरांसमवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही मार्च २०१७ मध्ये होत आहे... निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असल्याने साहजिकच पिंपरी चिंचवड मधल्या राजकीय हालचालींना वेग आलाय... या शहरावर गेली १५ हून अधिक वर्ष अजित पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी अर्थातच अजित पवार आहेत. 

Updated: Sep 13, 2016, 06:36 PM IST
अजित पवार : निवडणुका आणि विरोधक title=

कैलास पुरी , झी मिडिया पिंपरी चिंचवड : मुंबई पुणे नाशिक या शहरांसमवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही मार्च २०१७ मध्ये होत आहे... निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असल्याने साहजिकच पिंपरी चिंचवड मधल्या राजकीय हालचालींना वेग आलाय... या शहरावर गेली १५ हून अधिक वर्ष अजित पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी अर्थातच अजित पवार आहेत. 

राष्ट्रवादीला विरोधक तयार

गेली काही वर्ष इथे विरोधकांचे अस्तित्व अगदी नसल्यासारखे होते. पण कधी काळी अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण जगताप हे भाजप मध्ये आहेत आणि भाजप शहराध्यक्ष आहेत. त्यामुळं भाजपची ताकत वाढलीय. १५ ते २० नगरसेवक निवडून आणल्याची क्षमता त्यांच्यात असल्याने राष्ट्रवादीला पर्यायाने अजित पवार यांना शहरात दखल घेण्यायोग्य विरोधक निर्माण झालाय. 

अजित पवार vs चेले

लक्ष्मण जगताप यांच्या बरोबरच अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा ही भाजप प्रवेश निश्चित झाल्याने आता राष्ट्रवादी पुढचे आव्हान वाढले आहे. त्याच मुळे आगामी लढत अजित पवार विरुद्ध त्यांचे चेले अशी होणार आहे. महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने भाजप ची ताकत वाढली असली तरी भाजपचा फाजील आत्मविश्वास त्यांना मारक ठरण्याची चिन्हे अधिक आहेत. महेश लांडगे यांनी त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संयोगाने अजित पवार यांनी त्याच दरम्यान शहरातल्या गणेश मंडळांच्या भेटी घेतल्या. 

अजित पवारांची गणेश मंडळ भेट 

वास्तविक पाहता अजित पवार यांच्या मंडळांच्या भेटी आणि महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यात दुरान्वये संबंध नसताना लांडगे यांच्या प्रसिद्धीचे काम पाहणारे त्याचे बंधू कार्तिक लांडगे यांनी राष्ट्रवादी सैरभैर झाल्याचा सोशल मीडियावर भडीमार केला. महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशाने घाबरलेल्या अजित पवार यांनी गणपती मंडळांना भेटी दिल्या असे मेसेज सर्वत्र फिरवायला सुरुवात केली. काही स्थानिक दैनिकात तशी बातमी छापून आणण्याची किमया ही साधली.

महेश लांडगे हुरळून गेले....

खरे पाहता राजकारणात ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालो त्यांना लगेच अंगावर घेऊ नये ही साधी गोष्ट महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात आली नसल्याचे समोर येत आहे. महेश लांडगे यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे ही वस्तूस्थिती आहे. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय हा त्यांच्या ताकती पेक्षा त्यांचे विरोधक विलास लांडे यांच्यावर सर्वसामान्यांच्या असलेल्या रागामुळे झाल्याचे उघड गुपित आहे. असं असताना ही विधानसभा निवडणुकीतल्या विजयाने आत्मविश्वास वाढल्याने आणि काही स्थानिक वर्तमान पत्रांनी कायम प्रसिद्धीत ठेवल्याने महेश लांडगे गट भलताच हुरुळून गेल्याचे चित्र आहे. 

वास्तविक पाहता आमदार झाल्यानंतर महेश लांडगे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन त्यांच्या समर्थकाला नगरसेवक करणे गरजेचे होते. पण महेश लांडगे यांनी तसे केले नाही यातच सगळे आले. असे असताना निवडणुकांपूर्वीच महेश लांडगे गटाचा आत्मविश्वास त्यांना मारक ठरण्याची चिन्हे आहेत.

लक्ष्मण जगतापाची स्थिती जरा...

महेश लांडगे गटाची ही अवस्था असताना लक्ष्मण जगताप यांच्या गटाची ही काही वेगळी स्थिती नाही. स्वतः लक्ष्मण जगताप शांत असले तरी त्यांचे विश्वासू आणि लॅपटॉप मॅन  म्हणून ओळखले जाणारे सारंग कामतेकर यांचा नको तेवढा आक्रमकपणा पक्षाला मारक ठरण्याची चिन्हे आहेत. वास्तविक पाहता सारंग कामतेकर यांची लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कामतेकर यांनी जगताप यांना गॉडफादर केले आणि त्यांनी पक्षाची सर्व सूत्रे हातात घेतली. 

जगतापांमुळे जुन्या भाजप कार्यकर्त्यांना 'ताप'

आता त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भाजप मधली जुनी फळी कमालीची अस्वस्थ झालीय. त्यातच लक्ष्मण जगताप यांचे अनेक समर्थक जे तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रवादी मध्ये आहेत आणि जे कोणत्याही परिस्तिथीत जगताप यांची साथ सोडणार नाहीत अश्या लोकांचे दर दहा पंधरा दिवसांना भाजप प्रवेश घडवत राष्ट्रवादीला खिंडार असे चित्र ते बनवत आहेत आणि तश्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रात छापून आणत आहेत.

भाजपचा आत्मविश्वास मारक...

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आकडेवाडी सादर करत भाजप कसा सत्तेत येणार हे भाजप मधल्या अनेकांना पटवून देत आहेत. त्यांच्या या आभासी चित्राचा एवढा परिणाम झालेला आहे की निवडणुकापूर्वीच भाजपचे काही महाभाग मी महापौर, मी स्थायी समिती अध्यक्ष असा दावा खाजगीत करतायेत. खरे तर हाच आत्मविश्वास भाजपला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

अजित पवारांची पत्ते खुले नाही...

एकीकडे भाजप प्रचंड आत्मविश्वासात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने अजित पवार शांत आहेत. लक्ष्मण जगताप यांच्यावर केलेली टीका वगळता त्यांनी पत्ते उघडले नाहीत. आणि हीच बाब त्यांना वेगळे करतीय. शहरातले निर्णय नेत्यांच्या सल्ल्याने घेणाऱ्या अजित पवार यांनी   काही महिन्यांपासून शहराची सर्व सूत्र हाती घेतली आहेत. 

अजित पवारांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली

असंख्य दौरे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि रणनीती गुलदस्त्यात अश्या पद्धतीने अजित पवार पावले टाकत आहेत. ही निवडणूक सोपी नाही हे त्यांनी ओळखले आहे त्यामुळेच नेत्यांना ही ते मनात काय चालले आहे याची कल्पना येऊ देत नाहीत. लढाई आपणच मोठे केलेल्या जगताप आणि लांडगेशी आहे याची पुरती कल्पना असल्याने त्यांनी त्यांच्या पद्धतीने निवडणुकांची सूत्रे हातात ही घेतली आहेत. 

गुरू की चेले वरचढ...

महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप हे स्थानिक असले तरी शहराची गल्ली बोळातली माहिती अजित पवारांना आहे. राष्ट्रवादीत प्रचंड गट तट असताना सत्ता कायम ठेवण्याचा विश्वास त्यांना आहे. सगळ्यात महत्वाचे राजकारणात गुरु सगळेच डावपेच चेल्यानां शिकवत नसतात. हेच महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप गटाने लक्षात ठेवण्याची गरज आहे.