शैलेश मुसळे, मुंबई : साडे तीन मिनिटं टाळ्यांच्या कडकडाटात जबरदस्त स्वागत, ९ वेळा स्टॅंडिग ओवेशन, ७२ वेळा टाळ्या, ५ वेळा पोटधरुन हसणं असं ऐतिहासिक स्वरुप होतं बुधवारी अमेरिकन काँग्रेसच्या सयुंक्त क्षेत्राचं आणि संबोधित करत होते भारताचे १४ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
कालचा दिवस हा मोदींसाठी खरंच खास होता. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असाचं तो ऐतिहासिक क्षण. काल मोदींनी भारताची प्रतिमा अमेरिकेच्या संसदेत इतक्या सुंदरपण मांडली की प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलावी. काल भारत हा अमेरिकेकडे काही मागत नव्हता तर आम्ही देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून चालतोय असं मोदींनी भाषणातून सांगितलं.
अमेरिकेच्या संसदेला संबोधित करणारे मोदी हे भारताचे ५ वे पंतप्रधान होते. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक गोष्टींना अमेरिकन खासदारांकडून दाद मिळत होती. नेहमी भारताला कमी लेखणाऱ्या देशांना जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या संसदेतून मोदींनी ठणकावून सांगितलं की २१ वं शतक हा भारताचं आहे. अमेरिका आणि भारत मिळून जगाला मार्गदर्शन करतील असं देखील मोदींना काल सांगितलं.
बुधवारचा दिवस हा मोदींसाठी पहिली आणि मोठी संधी होती. मोदींनी या संधीचा पुरेपुर फायदा घेतला. अमेरिकन संसदेत अधिक खासदार हे कमी वयाचे आहेत. त्यामुळे जवळपास १० वर्ष तरी हे खासदार अमेरिकन संसदेत असतील. याच गोष्टीचा फायदा भारताला होऊ शकतो कारण मोदींनी त्या प्रत्येकाचं मन जिंकलं. मोदींच्या भाषणानंतर मोदींच्या ऑटोग्राफसाठी केलेली गर्दी हे सांगत होती. मोदींच्या मागे बसलेले संसदेचे स्पीकर हे देखील अगदी कमी वयाचे. ते देखील मोदींना टाळ्या वाजून आणि स्टॅंडिग ओवेशनने दाद देत होते. असं म्हटलं जातंय की, आगामी काही वर्षानतंर ते अमेरिकेचे पंतप्रधान बनू शकतील.
२००५ साली ज्या अमेरिकन काँग्रेसने मोदींना अमेरिकेत येण्यास विरोध दर्शवला होता तेच काल मोदींना स्टँडिंग ओवेशन देत होते. अमेरिकेत लवकरच राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक होणार आहे आणि त्यापूर्वीच मोदींनी मिळवलेली ही दाद भारतासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा उदाहरण देत म्हटलं की अमेरिका आणि भारत हे नॅचरल अलायन्स आहेत. मोदींनी ते पटवूनही दिलं. महात्मा गांधींकडून मार्टिन लूथर किंग यांनी प्रेरणा घेतली तर कोंलबिया युनिवर्सिटीमधून शिक्षण घेतलेल्या डॉ. आंबेडकरांच्या संविधानात अमेरिकेच्या संविधानातील काही गोष्टी झळकतात. असं उदाहारण देऊन त्यांनी अमेरिकन खासदारांना स्टॅंडिग ओवेशनसाठी भाग पाडलं.
बुधवारी झालेल्या या भाषणाकडे जगभराचं लक्ष होतं. पाकिस्तानला तर मोदींनी सडेतोड उत्तर दिलं. आमच्या समोरच्याच देशात दहशदवादाला थारा दिला जातो असं मोदींनी ठणकावून सांगितलं आणि अशा लोकांचा सगळ्यांनी एका आवाजात विरोध केला पाहिजे असं देखील मोदींनी म्हंटलं. असं म्हणतात की एखादी गोष्ट कशी होती हे ते अनुभवणाऱ्या लोकांनाच विचारलं पाहिजे. जेव्हा मोदींच्या भाषणाबाबत अमेरिकेच्या खासदारांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया या खूप काही सांगणाऱ्या होत्या. ग्रेट, माईंडब्लोईंग, वेरी नाईस अशा प्रतिक्रिया अमेरिकन खासदारांनी दिल्या.
पंतप्रधान मोदींचं बुधवारचं भाषण ही भारताची प्रतिमा उंचावणारी होती. एक भारतीय म्हणून प्रत्येकाने त्याचं कौतूक केलं पाहिजे आणि अभिमान ही वाटला पाहिजे. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा प्रतिसाद त्यांना वर्ल्ड लीडरच्या दिशेने घेवून जात आहे. मोदी हे काही दिवसात वर्ल्ड लीडर झाले तर आश्चर्य वाटायला नको. अफगाणिस्तानमध्ये मोदींना मिळालेला सर्वोच्च नागरी पुरस्कार ही त्याची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. भाषण संपल्यानंतर व्हाईट हाऊसच्या बाहेर काही लहान मुलांच्या प्रतिक्रिया या खूपच छान होत्या. हीच मुलं उद्याचे भविष्य आहे हे विसरुन चालणार नाही. विकास, दहशतवाद, ग्लोबल वॉर्मिंग यावर देखील मोदींनी प्रखर मत मांडलं.