सलमान मागे लपला आहे, आणखी एक 'सलमान खान'

सलमान हा एवढा काही चांगला माणूस नाही, नेहमीच यशाच्या शिखरावर असलेला हा नट, ग्लॅमरच्या दुनियेत भरकटून गेला आहे. सलमान रागीट आहे, असा जर तुमचा समज असेल, तर थोडंस सलमानविषयी हे जाणून घ्या.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 24, 2017, 07:00 PM IST
सलमान मागे लपला आहे, आणखी एक 'सलमान खान' title=

मुंबई : (जयवंत पाटील, झी २४ तास) अभिनेता सलमान खानच्या आयुष्यात अनेक वादळं आली, सलमानला त्याच्या कथित चुकांमुळे, कोर्ट-कचेरीचाही सामना करावा लागला. सलमान हा एवढा काही चांगला माणूस नाही, नेहमीच यशाच्या शिखरावर असलेला हा नट, ग्लॅमरच्या दुनियेत भरकटून गेला आहे. सलमान रागीट आहे, असा जर तुमचा समज असेल, तर थोडंस सलमानविषयी हे जाणून घ्या.

सलमान ने पैसेच दिले असतील दुसरं काय?

जळगाव जिल्ह्याच्या (अमळनेर) एका शेतकऱ्याच्या ६ महिन्याच्या मुलीला हृदयाचा आजार होता, ओवी सूर्यवंशीचा आजार ऑपरेशनने पूर्णपणे बरा होणार होता, यासाठी ६ लाख रूपये खर्च येणार होता, यासाठी शेतगहाण ठेवण्याच्या अटीवर एकाने पैसे दिले, पण अपूर्णच. पण ऑपरेशनचे पैसे काही जमत नव्हते, थेट शेत विकायला काढलं, पण खरेदी करायला कुणीही तयार नव्हतं.

तुम्हाला वाटलं असेल, सलमानने पैसे दिले असतील, ६ महिन्याची ओवी बरी झाली असेल, हेच पुढेही लिहिलं असेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर आणखी थोडा संयम आणि हातातलं काम थोडसं बाजूला ठेवून वाचा.

६ महिन्याच्या ओवीच्या वडिलांचं शेत गहाण...

ओवीचा काका कमलेश सूर्यवंशीने, हातात पैसे नसताना मुंबई गाठली, कुणीतरी मित्राने सलमान खान मदत करतो, त्याची एक संस्था आहे, असं सांगितलं, पण एवढा मोठा नट भेटणार कुठे, आणि मदत कशी देणार?, मुंबई आपल्याला नीट माहित नाही, तो पर्यंत आपली पुतणी ओवीचं काय होणार?, असे अनेक प्रश्न होते.

 ...त्यांना शेत नको, मुलगी हवी होती

सलमान खानचं बिईंग ह्युमनचं ऑफिस ओवीचा काका कमलेशने गाठलं, सलमानची बहिण अर्पिताने, कागदपत्रपाहून, सर्व प्रकरण जाणून घेतलं. मदत होईल की नाही याची शाश्वती नव्हती, पण अर्पिताने ओवीच्या ऑपरेशनला मदतीचा हात देऊ असा फोन केला. 

अर्पिता यांच्याकडून तज्ज्ञ डॉक्टरांचा आग्रह

मुंबईत अशा अनेक संस्था आहेत, मग सलमानने असं काय नवीन केलं? ओवीला एका दवाखान्याने थोड्या  कमी खर्चात ऑपरेशन सांगितलं होतं, पण खर्च वाढला तरी चालेल, पण योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑपरेशन करू या, अशी विनंती ओवीच्या पालकांना करण्यात आली, अर्थात ती त्यांनी मान्यही केली.

सलमान खानचे तुम्ही फॅन्स नसालंही, तरी शेवट मात्र तुम्हाला नक्की आवडेल...

सलमान खान रिक्षात बसला बातमी होते, सायकलीवर रस्त्यावर १ किमी गेला बातमी होते, जो सलमान नजरेला पडला तरी फॅन्स, त्याला सलमान...सलमान करतात... ग्लॅमरस सलमानला फिल्म शूट आणि इतर महत्वाच्या कामांना वेळ नाही.

ज्याच्या मागेपुढे बॉडीगार्डचा ताफा असतो, कुठेही गेलं तरी अडचणीचं होतं, पण असा सलमान खान एका ६ महिन्याच्या चिमुकलीला भेटण्यासाठी, वांद्रे येथून थेट मुलूंडला फोर्टिज हॉस्पिटलमध्ये, कुणाला कानोकान खबर न लागू देता, ओवीच्या तब्येतीची विचारपूस करायला पोहोचला.

पोस्टाच्या पत्रात हरवलेला गोड पापा

सलमान ओवीला पाहून, तिच्याशी बोलत होता, अगदी आपण आपल्या लहान मुलांसोबत बोलतो तसं, पत्रात हरवलेला लहान मुलांना देतात तसा, गोड पापाही सलमानने ओवीचा घेतला. 

सोबत कोण आहे, असं विचारलं, इतर खर्च कसा काय केला? असं पालकांना विचारलं, तेव्हा शेत गहाण ठेवल्याचं ओवीच्या काकांनी सांगितलं.

सलमानही हळहळला

सलमान ते ऐकून हळवा झाला, हे पाहून सलमानने नुसतेच पैसे दिले नाहीत, तर त्या पैशांना मायेचा ओलावा होता. सलमान याच दरम्यान म्हणाला, शेतकऱ्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे, पैशांचं काही तरी करू या, आणि डॉक्टरांना आणखी लक्ष द्या, धन्यवाद म्हणून, ६ महिन्याच्या ओवीला बाय करून सलमान, आला तसाच खुष्कीच्या मार्गाने निघून गेला. सलमाने पुढे काय केलं माहित नाही, पण ओवीला डिस्चार्जनंतरही पुढचा एकही रूपया द्यावा लागला नाही, ओवीला आरोग्य तर मिळालं पण तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ओवीच्या वडिलांचं शेतही वाचलं.