मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का? आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का? की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश खेळतात. त्यातही अनेक आशियाई देशांना युरोपच्या संघाशी क्रिकेटला मुकाबलाच करावा लागत नाही. हे या बाईंना कोण समजावणार ?
क्रीडा प्रकार आणि खेळाडू हे तसं टीका करण्यासाठी सॉफ्ट टार्गेट...कारण खेळाप्रमाणे इतरही क्षेत्रांमध्ये भारताची तशीच परिस्थिती आहे. जागतिक पातळीवरचा दर्जा पाहिल्यास आपल्याकडी मूलभूत सुविधा, अर्थव्यवस्था, लष्करी ताकद यामध्येही आपण मागेच असतो. ऑस्करसारख्या जागतिक पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट आणि कलाकांनाही क्वचितच पुरस्कार मिळतो. मग केवळ क्रीडा क्षेत्राबाबतच आरडा-ओरडा का? खेळाचा निकाल हा सा-यांसमक्ष होतो म्हणून आपल्याला क्रीडा क्षेत्रातील अपयश थेट दिसतं. मात्र इतर क्षेत्रातही आपली काहीशी तशीच परिस्थिती आहे. शोभा डे यांनी रियो ऑलिम्पिकमधून खेळाडू हात हलवत परत येतील असं म्हटलय. कदाचित खेळाडू हात हलवत परत येतीलही. पण म्हणून त्यांच्या मेहनतीला कमी लेखून चालणार नाही. कोणताही खेळाडू हरण्यासाठी खेळत नाही. इतर क्षेत्रांप्रमाणे खेळातही भारतीयांना युरोपियन देशांचा मुकाबला करावा लागतो.
मुळातच खेळाला भारतात प्रतिष्ठा नाही. खेळाडूला पाहिजे तेवढी प्रतिष्ठा दिली जात नाही. मग खेळाकडे कोण वळणार? खेळाडूला त्याच्या मेहनतीएवढा आदर दिला जात नाही. खेळ आणि खेळाडू म्हणजे ज्याप्रमाणे प्रसारमाध्यमांमध्ये अखेरच्या पानावर किंवा बातमीपत्रात अखेरच्या सेगमेंटमधील बातमी असते तेच स्थान त्यांना दैनंदिन जीवनात दिलं जातं. महिला खेळाडूंना आपल्याकडे अजूनही पोषक वातावरण नाही. भारताची अव्वल टेनिस स्टार सानिया मिर्झाचा खेळ किती लोक खेळाच्या माध्यमातून पाहतात याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. ग्रामीण भागातील महिला खेळाडूंची तर परिस्थिती अजूनच बिकट...
मुळात त्यांचा संघर्ष सुरु होतो तो तिच्या घरातूनच...सुरुवातीला कुटुंबाचा फारसा पाठिंबा नसतो एखाद्या स्थानिक शिक्षकाला तिच्यातील गुणवत्ता दिसते आणि मग ते तिच्या घरच्यांना समजावतात. मग या ग्रामीण महिला खेळाडूंच्या करियरला सुरुवात होते. खेळासाठी आवश्यक असलेला पोषाख घातल्यावर तिच्याकडे लोकांचा कटाक्ष असा काही असतो की त्या महिला खेळाडूला कन्फर्टेबल वाटत नाही. जोपर्यंत ती काही भरवी कामगिरी करत नाही तोपर्यंत तिला अशा घटनांना समोर जावं लागतं किंवा संघर्ष करावा लागतो.
मध्यमवर्गीय आणि गरीब सामाजिक स्तरातूनच प्रामुख्यानं खेळाडून घडतात. कारण मेहनत करण्याची त्यांच्याकडे नैसर्गिक वृत्ती असते संघर्ष करणं हे त्यांच्या रक्तात असतं. या खेळाडूंना करियरच्या सुरुवातीच्या काळात सुविधांसाठीच खूप संघर्ष करावा लागतो. यानंतर त्यांना आपल्या कामगिरीवर मेहनत घ्यावी लागते. याबाबत शोभा डे यांनी कधी विचार केला आहे का ? की आपण म्हणजे सर्वज्ञानी म्हणून कोणत्याही क्षेत्रावर किंवा घटनेवर भाष्य करायचा आपल्याला जणू अधिकार आहे असा शोभा डे यांचा समज आहे का ? शोभा डे यांनी अशाप्रकारे ट्विट करुन भारतीय खेळाडूंचा अपमान केलाय.