www.24taas.com, नवी दिल्ली
२०१३-१४ या वर्षासाठी आज संसदेत रेल्वेबजेट सादर होणार आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल हा अर्थसंकल्प सादर करतील. तब्बल १७ वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री संसदेत बजेट सादर करणार आहेत.
रेल्वेमंत्र्यांच्या पेटाऱ्यात दडलंय काय याची साऱ्यांना उत्सुकता असली तरी प्रवाशांवर पुन्हा एकदा भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तवली जातेय. या रेल्वे बजेटमधून राज्यांच्या पदरात काय पडणार याकडं साऱ्यांचं लक्ष आहे. तसंच मुंबईकरांचा प्रवास सुखकर करुन रेल्वेमंत्री दिलासा देणार का याचीही उत्सुकता आहे.
डिझेलचे दर सतत वाढत असल्यानं रेल्वेला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या नफ्यात घट होतेय. त्यामुळं रेल्वेच्या आर्थिक गणितांवर परिणाम होतोय. हे बिघडलेलं आर्थिक गाडं रुळावर आणण्यासाठी प्रवासी भाढेवाढीची घोषणा आजच्या बजेटमध्ये होण्याचे संकेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी दिलेत. रेल्वेनं यापूर्वीच गेल्या महिन्यात भाढेवाढ केली होती. मात्र, त्यानंतर लगेचचं डिझेल दरवाढीमुळें रेल्वेवर तीन हजार तीनशे कोटींचा बोजा पडलाय. त्यामुळे या भाडेवाढीचा रेल्वेला फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळं उत्पन्न वाढीसाठी दरवाढीची आणखी एक कुऱ्हाड रेल्वे प्रवाशांवर कोसळण्याची शक्यता आहे. दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे तिकीट आधार कार्डशी जोडले जाण्याची शक्यता आहे. तसंच रेल्वे तिकीटांवर बार कोडींगचीही व्यवस्था करण्यात येण्याचे संकेत रेल्वे प्रशासनानं दिले आहेत. तसंच सफाई आणि महिला सुरक्षेवरही भर दिला जाऊ शकतो.