‘बूम’ ते ‘धूम’... कतरीनाचा बॉलिवूड प्रवास!

कतरीना आज बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडमधील तिच्या करिअरला नुकतेच तिने दहा वर्ष पूर्ण केलीय. कतरीनाच्या एक दशकांच्या या फिल्मी प्रवासावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 8, 2013, 12:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कतरीना आज बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडमधील तिच्या करिअरला नुकतेच तिने दहा वर्ष पूर्ण केलीय. कतरीनाच्या एक दशकांच्या या फिल्मी प्रवासावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...
आजवर बॉलिवूडमध्ये नशिब आजवण्याचा प्रयत्न अनेक सौंदर्यवतींनी केला खरा… मात्र, कतरीनासारखं यश फारचं थोड्या जणींना मिळालं. विशेष म्हणजे भाषेची प्रमुख अडचण असतानाही कतरीना आज पहिल्या तीन अभिनेत्रींमध्ये गणली जातेय. आज प्रत्येक आघाडीचा दिग्दर्शक तिला घेऊन सिनेमा करण्यास उत्सुक आहे. यशराज फिल्मसारख्या बॉलिवूडमधील बड्या प्रॉडक्शन हाऊसचे चित्रपट तिच्याकडं चालून येत आहेत.
२००३ मध्ये जेव्हा तिचा ‘बूम’ हा पहिलाच सिनेमा आला तेव्हा ती बॉलिवूडमध्ये तिला एवढं यश मिळेल याची कुणी कल्पनाही केली नसेल. पण आज तिने आपलं महत्त्व सिद्ध केलंय. खरं तर तिच्या अभिनयाची अद्याप कसोटी लागली नाही. मात्र, तिच्या सिल्व्हर स्क्रिनवरचा अपिअरन्स प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. बूमच्या अपयशानंतर कतरीनाने काही दक्षिणात्य सिनेमात काम केलं होतं. तिथं काही प्रमाणात यश मिळालं मात्र तिचं टार्गेट बॉलिवूड होतं. बॉलिवूडमध्ये तिला आपलं स्थान निर्माण करायचं होतं आणि आपल्या पुढच्याच सिनेमातून तिने त्याची चुणूक दाखवून दिली.

अभिनेता अक्षय कुमारसोबत तिचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला खरा मात्र पुढे हीच जोडी हिट ठरली. अक्षयकुमारसाठी तर ही लकी गर्ल ठरली. आज ती ‘पापाराझी’ची लाडकी आहे. सलमान, शाहरुख आणि अमीर या बॉलिवूडमधील तीन खानसोबत काम करण्याची प्रत्येक ‘न्यू कमर’ची हिरोईनची इच्छा असते. कतरीना याबाबतीतही लकी ठरलीय. पण त्यासाठी तिला दहा वर्ष घालवाली लागली.

सलमान, शाहरुखसोबत काम केल्यानंतर आता ती ‘धूम – थ्री’ मधून अमीर खान सोबत रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झालीय. धूममध्ये ती अॅक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. खानत्रयींसोबतच कतरीनाने ऋतिक रोशन, अक्षयकुमार आणि रणबीर कपूरसोबतही चित्रपट केले. ऋतिक रोशनसोबत ती एका नव्या सिनेमात लवकरच झळकणार आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये ऋतिक रोशनबरोबर तिची केमिस्ट्री चांगलीच जमली होती. हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा पहायला मिळणार आहे. कतरीना आज ज्या स्थानावर पोहोचलीय आणि ज्या वेगाने ती वाटचाल करतेय ती पाहता तिला रोखणं तिच्या प्रतिस्पर्धी अभिनेत्रींना सध्या तरी शक्य नाही, असंच दिसतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.