अमेरिकेची `एफबीआय` करणार जियाच्या मृत्यूचा तपास?

अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलंय. जियाची आई राबिया खान यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर नाराजी व्यक्त केलीय आणि या प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणा `एफबीआय`नं तपास करावा अशी मागणी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2014, 11:52 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण लागलंय. जियाची आई राबिया खान यांनी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रावर नाराजी व्यक्त केलीय आणि या प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणा `एफबीआय`नं तपास करावा अशी मागणी केलीय.
राबिया स्वतः ब्रिटिश नागरिक आहेत आणि जिया अमेरिकन नागरिक होती. त्यामुळे या प्रकरणी राबिया खान यांनी अमेरिकन वकिलातीकडे मदत मागितली होती. वकिलातीनं या प्रकरणाची माहिती `एफबीआय`ला दिली आणि कागदपत्र पाहिल्यानंतर `एफबीआय`नं तपास करण्यास अनुकूलता दर्शवली आहे. या संदर्भात अमेरिकन दूतावासानं राबिया खान यांना एक पत्र पाठवलंय. त्यानुसार २७ तारखेला राबिया आणि `एफबीआय` अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
यापूर्वी राबिया खान यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत राबिया खान यांनी जियाची हत्या झाल्याचा दावा केलाय. जियाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, जियानं गळफास लावून आत्महत्या केली असती तर तीची जीभ आणि डोळे बाहेर आले असते. परंतु, जियाचा मृतदेह पाहून अशा कोणत्याही गोष्टी दिसून आल्या नाहीत. यासोबतच जियाच्या वकिलांनी आणखीही काही कारणं दिली आहेत, ज्यामुळे जियाचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला जातोय. वकिलांच्या म्हणण्यानुसार, जियाच्या गळ्यावर फाशीचे वळ सरळ होते. तीनं आत्महत्या केली असती तर हेच निशाण गोलाकार आकारात असतं, असं राबिया यांचं म्हणणं आहे.
३ जून २०१३ रोजी जिया खान हिचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करताना जियानं आत्महत्या केल्याचं नमूद केलं होतं. या प्रकरणात जियाचा मित्र सूरज पांचोली याला पोलिसांनी अटकही केली होती. सूरज पांचोली हा अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.