जियाच्या आईचा सूरजच्या आईला भेटण्यास नकार

जिया खान आणि सूरज पांचोली हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत असल्याचं जिया खान हिच्या आईनं – राबिया खान - यांनी पोलिसांना सांगितलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 12, 2013, 12:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जिया खान आणि सूरज पांचोली हे दोघे गेल्या वर्षभरापासून एकमेकांसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत असल्याचं जिया खान हिच्या आईनं – राबिया खान - यांनी पोलिसांना सांगितलंय. सूरजला कोर्टानं १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. दरम्यान, सूरजची आई झरिना वहाब यांनी जियाच्या आईची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण जियाच्या आईनं मात्र नकार दिल्यानं त्यांना माघारी फिरावं लागलं.
अभिनेता आदित्य पांचोली आणि अभिनेत्री झरिना वहाब यांचा २२ वर्षीय मुलगा सूरज पांचोली याला २५ वर्षीय अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलीय. जियानं गेल्या सोमवारी, ३ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती.
`जियाच्या आईची भरुन न निघणारी हानी झाली आहे. जियाच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करते` असं झरिना वहाब यांनी म्हटलंय. ‘सूरज चांगला मुलगा आहे आणि जियाच्या आत्महत्येमागे त्याचा हात नसल्याचं’ही सूरजच्या आईनं म्हटलंय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे आपण सूरजच्या अटकेविरोधात कोर्टात जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

पोलिसांच्या तपासात आत्तापर्यंत
जिया आणि सूरज गेल्या एका वर्षापासून सहजीवनात असल्याची माहिती जियाच्या आईनं पोलिसांना दिलाय. जियाच्या आत्महत्येनंतर तीन दिवसांनी मिळालेल्या एका सहा पानी पत्रात जियानं सूरजनं तिला धमकावणं, हाणामारी करणं आणि बलात्कार केल्याचं म्हटलंय. राबिया यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सूरजनं तिला ब्रेक-अप पुष्पगुच्छ पाठवल्यानंतर जिया उन्मळून पडली होती. याचमुळे तीनं टोकाचं पाऊल उचललं. सूरजनं जियाला लग्नाचं वचनही दिलं होतं’. दरम्यान, ‘माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर जखम होती. तीला मारहाण करण्यात आली होती त्याचमुळे तीनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मी तिथं असायला हवी होते... त्यानं (सूरज) तिच्यावर हात उचलण्याची हिंमतच कशी केली’ असं राबिया यांनी ट्विटरवर म्हटलंय.
सूरजचा पिता आदित्य पांचोली याला या प्रकरणात जोडण्याचा कोणताही पुरावा आपल्या हाती लागला नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. जियाच्या पत्रात गर्भपाताचा उल्लेख आढळल्यानंतर तीनं हा गर्भपात कोणत्या हॉस्पीटलमध्ये केला होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. जियाच्या पत्रात ‘बलात्कारा’चा उल्लेखदेखील आहे. परंतू, सूरजवर बलात्काराचा आरोप लावता येईल का? यावर पोलीस अजून विचार करत आहेत.
दरम्यान, सुरजच्या वकिलांनी, सूरजनं जियाला लग्नासंबंधी कोणतंही वचन दिलं नसल्याचा कोर्टात दावा केलाय. तसंच जिया ही गेल्या काही दिवसांपासून निराशेच्या गर्तेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.