www.24taas.com, लाहौर
पाकिस्तानचा सुपरफास्ट बॉलर शोएब अख्तरनं आपल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परत यायचंय. पण, यावेळी त्याला खेळाडू म्हणून नाही तर बॉलिंग प्रशिक्षकाची भूमिका निभावण्याची इच्छा आहे.
शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना शोएबनं म्हटलंय की, जर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं म्हणजेच पीसीबीनं सांगितलं तर मी कोचचं पद सांभाळण्यासाठी तयार आहे. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना शोएब म्हणते, ‘आत्तासुद्धा क्रिकेट म्हणजे माझ्यासाठी एक ‘पॅशन’ आहे. माझी या खेळाशी जुडलेली नाळ मला कायम ठेवायचीय. कालपर्यंत मी एक खेळाडू होतो पण आज मी कोच बनू शकतो.’ शोएबला पाकिस्तानी क्रिकेटनं आत्तापर्यंत भरपूर काही दिलंय. याच गोष्टींचा परतावा करण्याची त्याची इच्छा आहे. यासाठी तो म्हणतो, ‘जर बोर्डानं माझ्याशी संवाद साधला तर मला राष्ट्रीय बॉलिंग कोच बनायला नक्कीच आवडेल.’
यावर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची काय प्रतिक्रिया असेल यावर सगळ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलंय. शोएबची इच्छा पूर्ण झाली तर खेळाडू म्हणून नाही तरी कोच म्हणून त्याला मैदानात पुन्हा एकदा पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळेल.