www.24taas.com, झी मीडिया, दुबई
भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड विरूद्ध भारत पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. सध्या भारतीय संघ हा १२० गुणांसह आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमाकांवर आहे.
भारताला हे प्रथम स्थान कायम राखण्यासाठी न्यूझीलंड विरूद्धची मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. याच क्रमवारीत न्यूझीलंड हा भारताहून ३६ गुणांनी मागे असून आठव्या क्रमांकावर आहे. जर न्यूझीलंडने ही मालिका जिंकली तर क्रमवारीत सुधारणा होऊन न्यूझीलंड सातव्या क्रमांकावर जाईल. मात्र न्यूझीलंडने ही मालिका गमावल्यावर त्याच्या क्रमवारीत फरक पडणार नाही. ही मालिका गमावल्यास भारताला आपले अव्वल स्थान देखील गमवावे लागेल आणि भारताचे ६ गुण कमी होतील.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून १-० अशी आघाडी घेतलेली आहे. ऑस्ट्रलिया आयसीसी क्रमवारीत भारतापासून ६ गुणांनी मागे असून दुसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ३-२ असे हरविल्यास त्याचबरोबर न्यूझीलंडने भारताला ३-२ असे हरविल्यास ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी विराजमान होऊ शकते. त्यामुळे भारताला आपल्या प्रथम स्थानापासून ऑस्ट्रेलियास दूर ठेवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकणे क्रमप्राप्त आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.