www.24taas.com, झी मीडिया, अबुधाबी
जॅक कॅलिस, मनीष पांडे यांची अर्धशतकी खेळी आणि त्यांना गोलंदाजीत लाभलेली सुनील नरिनची साथ यामुळं २०१२ सालच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सनं गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ४१ धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या सातव्या पर्वात विजयी सलामी दिली.
कॅलिस आणि पांडे यांच्या धडाकेबाज खेळीमुळे कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा उभारल्या. हे उद्दिष्ट पेलताना मुंबईची सुरुवातीलाच दमछाक झाली. अनुभवी माईक हसी (३) आणि आदित्य तरे (२४) लवकरच बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने अंबाती रायुडूच्या साथीने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. नरिनने मैदानावर स्थिरावलेल्या रायुडूला बाद केल्यानंतर मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या.
रायुडूने ४० चेंडूंत चार चौकारांसह ४८ धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईचे फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे गतविजेत्यांना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
कोलकातानं टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि जॅक कॅलिस आणि मनीष पांडे यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर संघाला १६३ धावा उभारून दिला. कॅलिस आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी रचत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. कॅलिसने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ४६ चेंडूमध्ये ७२ धावांची अफलातून खेळी साकारली, तर पांडेने ६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ६४ धावांची खेळी साकारत कॅलिसला चांगली साथ दिली.
मुंबईकडून लसिथ मलिंगाने भेदक मारा करत कोलकात्याच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट राडयर्स : २० षटकांत ५ बाद १६३ (जॅक कॅलिस ७२, मनीष पांडे ६४; लसिथ मलिंगा ४/२३) पराभूत वि.
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ७ बाद १२२ (अंबाती रायुडू ४८, रोहित शर्मा २७; सुनील नरिन ४/२०). सामनावीर : जॅक कॅलिस.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.