`... त्या खेळाडूंवर आजन्म बंदी घाला`

‘तीनही खेळाडूंना निलंबित करण्याचा बीसीसीआयनं घेतलेला निर्णय योग्यच’ असल्याचं माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2013, 01:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘तीनही खेळाडूंना निलंबित करण्याचा बीसीसीआयनं घेतलेला निर्णय योग्यच’ असल्याचं माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.
‘आयपीएलच्या तीन खेळाडूंना झालेली अटक आणि समोर आलेलं फिक्सिंग केवळ धक्कादायक आहे. ‘आयपीएल’नं नव्या खेळाडूंना खेळण्यासाठी चांगली संधी दिलीय... इतर खेळाडूंशी एकत्र येऊन खेळण्याची संधीही त्यांना उपलब्ध झाली. पण, तरिही जर काही खेळाडूं मॅच फिक्सिंगसारख्या चुकींच्या कामात सहभागी होण्यासाठी तयार झाले असतील... तर बीसीसीआयनं त्यांना निलंबित करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे’ असं शरद पवार यांनी म्हटलंय.
‘केवळ निलंबन करून भागणार नाही तर बीबीसीआयला खोलात जाऊन या प्रकरणाची चौकशी करावी लागेल तसंच यामध्ये आणखीही काही खेळाडू सहभागी आहेत का हे तपासून पाहावं लागेल... आणि फिक्सिंगसारख्या प्रकरणांमध्ये खेळाडू दोषी आढळले तर अशा खेळाडूंवर आजन्म बंदी आणायला हवी.... कारण यामुळे केवळ टीमचंच नाही तर देशाचंही नाव खराब होतं’ असं म्हणत वेळीच कठोर पावलं वेळीच उचलायला हवीत असा सल्लाही पवारांनी बीसीसीआयला दिलाय.

आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना – श्रीसंत, अंकीत चव्हाण आणि अजित चंदेलिया यांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकानं या तिघांसोबतच सात बुकिंनाही अटक केलीय. तर अन्य दोन बुकी फरार झालेत. मोहाली आणि मुंबईत काल झालेल्या सामन्यात या खेळाडूंनी फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणानं आयपीएलच्या आयोजकांना मोठा धक्का बसला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.