न्यूयॉर्क ते नेवांग (कथा)

न्यूयॉर्कच्या 135 मजली टोलेजंग पॉश इमारतीच्या अवाढव्य पार्किंगमध्ये नेमक्या जागेवर कैवल्यनं नेहमीच्या सफाईनं गाडी पार्क केली. बाहेर दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या आफ्रिकन-अमेरिकन गार्डनं ठोकलेल्या सॅल्युटचा शिष्टशीर पद्धतीनं स्वीकार केला. डोक्यात दिवसभराच्या साऱ्या कामांच, बोर्ड मीटिंगचं चक्र त्याच्या डोक्यात घुमू लागलं. त्याचा प्रत्येक मिनिट नं मिनिटं हा ‘लाख’ मोलाचा होता. आज सोमवार. आठवड्याचा पहिला दिवस

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 1, 2013, 08:32 PM IST

न्यूयॉर्कच्या 135 मजली टोलेजंग पॉश इमारतीच्या अवाढव्य पार्किंगमध्ये नेमक्या जागेवर कैवल्यनं नेहमीच्या सफाईनं गाडी पार्क केली. बाहेर दरवाज्यापाशी उभ्या असलेल्या आफ्रिकन-अमेरिकन गार्डनं ठोकलेल्या सॅल्युटचा शिष्टशीर पद्धतीनं स्वीकार केला. डोक्यात दिवसभराच्या साऱ्या कामांच, बोर्ड मीटिंगचं चक्र त्याच्या डोक्यात घुमू लागलं. त्याचा प्रत्येक मिनिट नं मिनिटं हा ‘लाख’ मोलाचा होता. आज सोमवार. आठवड्याचा पहिला दिवस. आज सारी कामं नेहमीच्याच सफाईनं आणि 100 टक्के बिनचूक पद्धतीनं झाली पाहिजेत. पहिला दिवस चांगला गेला तरच आठवडा चांगला जातो, अशी त्याची ठाम समजूत. याच मनोनिग्रहानं तो ऑफिसात शिरला. कामाच्याच विचारात असलेल्या कैवल्यनं सहका-यांच्या हाय सर, हॅलो सर, गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू सर चा नेहमीच्याच परिटघडानं स्वीकार केला आणि आपल्या केबिनमधल्या खुर्चीवर स्थानापन्न झाला.
ऑफिसात आल्यानंतर आधी सर्व मेल चेक करायची हा त्याचा शिरस्ता. मेल चेक करत असतानाच भारतामधल्या पेपरच्या साईट त्यानं नेहमीच्या सवयीनं ओपनं केल्या. आज सलग तिस-या दिवशी मणिपूरच्या अशांततेची बातमी प्रमुख पेपरनं फ्रंट पेजवर घेतली होती हे कैवल्यला त्याची ई एडिशन पाहताना समजले. एरवी मणिपूरसारख्या दुर्गम राज्याला फारसं महत्त्व न देणारी ही सारी वृत्तपत्र सलग तिस-यांदा मणिपूरची बातमी देतायत. म्हणजे मामला गंभीर आहे. मणिपूरच्या बातम्यांमध्ये रस असण्याचं त्याचं कारण म्हणजे त्याची रियल लाईफमधली सर्वात जवळची दोन माणसं त्य़ाचे आई-बाबा मणिपूरच्या विवेकानंद केंद्रात सेवाव्रतीचं काम करत होते. धुमसत्या मनस्थितीला शांत करत कैवल्यनं ऑफिसातली काम नेटानं सुरु ठेवली.
दिवसभराची कामं संपवून घरी परतल्यावर नेहमीच्या रितेपणासह कैवल्य घरात शिरला. आज पैसा, प्रतिष्ठा, स्टेटस, बॅँक बॅलेंस सारं काही त्याच्याजवळ आहे. पण हे सारं शेअर करायला कुणीच नाही. आपण आनंदी आहोत, यशस्वी आहोत हे समाजाला दाखवण्याचा आणि स्वत:ला समजवण्याचा प्रयत्न तो सतत करतो. पाच दिवस भरगच्च काम आणि नंतर दोन दिवस भरपूर एन्जॉय अगदी अमेरिकन लाईफस्टाईल अंगात भिनलंय. तरी हे सर्व करत असताना आपले आई-बाबा तिकडं सात समुद्रापार घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मणिपूरमध्ये एका खेड्यात सेवाव्रतीचं आयुष्य जगतायत. किती बुलशीट आहे हे सारं? हा सारा डोलारा आपण कुणासाठी उभा करतोय? त्यांचे समाजसेवीची डोहाळं कधी पूर्ण होणार? ही सारी प्रश्न कैवल्याच्या डोक्याचा रोज रात्री केमिकल लोचा करतात. या केमिकल लोच्याची रिएक्शन त्याला जाणवू लागली होती अखेर 15 दिवसांच्या रजेचा मेल ऑफिसला टाकला आणि भारताला जाण्याचे निश्चित केल्यानंतरच कैवल्यला किती तरी दिवसांनी शांत झोप लागली.
दुस-या दिवशी सकाळी कैवल्यनं ट्रॅव्हल एजंटला तातडीनं फोन केला. “ एक नवी दिल्ली अगदी तातडीनं लगेच हो, हो अगदी फास्ट, महाग असेल तरी चालेल. भारतात सध्या पावसळा आहे?, असू दे महापूर येऊन सारं काही वाहून जाण्याची वेळ आलीय आता आयुष्यात त्यामुळे आहे ते वाचवण्यासाठी पावसाळा असो की उन्हाळा मला तिकीट तातडीनं हवंय. काहीही चौकशी न करता थेट तिकीट काढणारा तो ट्रॅव्हल एजंटचं पहिलंच गिऱ्हाईक असावा. ऑफ सिजनमध्ये वाटेल ती किंमत मोजणारं गि-हाईक मिळाल्यानं एजंटही खूश झाला. त्यानं तातडीनं ते तिकीट त्याच्या हाती ठेवलं.
विमानात उडल्यानंतर अगदी वेगळाच फिल येतो. सारं जग आपल्या खाली आणि आपण आकाशात...अगदी वर टॉपला. टॉपला जाण्याचं वेड आपल्याला कधी शिरलं हे कैवल्य आठवू लागला. शाळेत असेपर्यंत वर्गातल्या हुशार मुलांमध्ये कधीच नव्हतो आपण. अगदी ढ ही नाही आणि हुशारही नाही. त्यामुळे कोणत्याच कारणामुळे शाळेत कुणाच्या लक्षात आलो नाही.
घरी आई आणि वडील. वडील प्रपंच चालवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून नोकरी करत बाकी सारा वेळ सामाजिक कार्य. परिसरातल्या दुष्काळगस्त भागातल्या केंद्राच्या कामात प्रत्येक शनिवार-रविवार वेळ दे. त्यांना धान्य वाटप कर. ऊस कामगारांच्या मुलांसाठी सुरु असलेल्या साखर शाळांच्या कामाचा आढावा घे. भूकंपाने उद्धवस्त झालेलं एक गावं नव्यानं वसवण्याची जबाबादारी स्वामी विवेवेकानंद केंद्रानं त्यांच्यावर सोपवलेली. सामाजिक काम असलं की वडिलांना नवा उत्साह येत असे. त्या गावाचं पूनर्वसन हॆच आपले जीवतकार्य आहे, त्यामुळे ते अधिकाधिक निर्दोष पद्धतीनं पूर्ण झालं पाहिजे या ध्येयानं ते झपाटलेले. हा सारा परमार्थ करत असताना घराकडे त्यांचं फारसं लक्ष नसायचंच.
कैवल्यला वडिलांच्या या सा-या कामाबद्दल आदर होता. पण आपणही तसंच काम करांव