झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूनिर्मितीमधील प्रसिद्ध कंपनी पॅनासॉनिकने जपानी भाषा आणि संस्कृतीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. जपानी भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या, विज्ञान-तंत्रज्ञान विषय घेऊन पदवीधारकांना ही शिष्यवृत्ती मिळविता येईल.
दीड लाख येन मासिक इतकी ही शिष्यवृत्ती पहिल्या वर्षी देण्यात येणार असून पुढील दोन वर्षांत ती १ लाख ८० हजार येन इतकी वाढविण्यात येईल, असे पॅनासॉनिकने स्पष्ट केले आहे.
पॅनासॉनिकतर्फे देशातील २० इंजिनीअरींग महाविद्यालयांमध्ये ‘पॅनासॉनिक स्कॉलरशीप प्रोग्राम’ जाहीर करण्यात आला असून, ३१ मार्च २०१२पर्यंत भारतातील इंजिनीअरींग महाविद्यालयांमधील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना जपानी संस्कृतीची ओळख करून दिली जाईल, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील नव्या बदलांची ओळख करून दिली जाईल. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय असावा, त्याने पदवी घेतलेली असावी, विज्ञान आणि तंत्रज्ञानात पदवी पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांनाही या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, मात्र जपानी संस्कृतीशी ओळख करून घेण्याची विद्यार्थ्यांची तयारी असावी, जपानी भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची तयारी असावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.