मुंबई : पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परीक्षा घेण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा न घेताच शाळा विद्यार्थ्यांना पास करत होती. त्यासाठी शिक्षण हक्क कायद्याकडे बोट दाखवले जात होते. पण परीक्षा टाळणार्या अशा शाळांना शिक्षण विभागाने चाप लावण्याचे ठरवले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंत वार्षिक परीक्षेसह तीन चाचण्या घ्याव्या लागणार आहेत.
विद्यार्थी नापास झालाच तर त्याला विशेष प्रशिक्षण देऊन वरच्या वर्गात नेण्यात येणार आहे, पण परीक्षा या घ्याव्याच लागतील, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरात तीन परीक्षा घेणे शाळांना बंधनकारक करण्यात येणार आहे.
सहामाही, वार्षिक आणि वर्षाच्या सुरुवातीलाच पायाभूत चाचणी, अशा तीन परीक्षा या वर्गांसाठी घेतल्या जाणार आहेत, अशी घोषणा विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापासच करायचे नाही या तरतुदीचा चुकीचा अर्थ काढून परीक्षा न घेणार्या शाळांना तसे निर्देश देण्यात येणार आहेत.
शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. पहिली ते आठवीपर्यंत मुलांना नापास न करण्याच्या निर्णयामुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न दीप्ती चौधरी, डॉ. सुधीर तांबे, हुस्नबानू खलिफे आदी सदस्यांनी विचारला होता. नापास करायचे नाही म्हणून परीक्षांचे गांभीर्यच राहिले नसून मुलांचेही अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खलिफे यांनी केला. त्यावर तावडेंनी उत्तर दिले. दरम्यान, बोगस शिक्षकांवर कारवाई करण्याचे संकेत यावेळी त्यांनी दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.