MPSC परीक्षेत रमेश घोलप राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत रमेश गोरख घोलप हा राज्यात पहिला आला आहे. मनिषा धोंडीराम छोठे ही राज्यात दुसरी, तर मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे.

Updated: Jul 1, 2012, 10:24 AM IST

www.24taas.com,मुंबई

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत रमेश गोरख घोलप हा राज्यात पहिला आला आहे. तर मनिषा धोंडीराम छोठे ही राज्यात दुसरी आली असून मुलींमध्ये ती राज्यात पहिली आली आहे.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, सहायक विक्रीकर आयुक्त आणि आदी पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षांचा निकाल ‘एमपीएससी’ने शनिवारी संकेतस्थळावर जाहीर केला. रमेश घोलप हा अपंग उमेदवार सर्वाधिक १२४४ गुण मिळवून राज्यात आणि अपंगांतही पहिला आला. ‘उपमुख्य कार्यकारी अधिकारी-गटविकास अधिकारी गट अ’ या पदावर त्याची निवड झाली आहे. तर मनिषा धोंडीराम छोठे ही १२२७ गुण मिळवून राज्यात दुसरी, तर मुलींमध्ये आणि मागासवर्गीय उमेदवारांमध्येही पहिली आली. ‘सहायक विक्रीकर आयुक्त गट अ’ या पदावर तिची निवड झाली आहे.

 

नवनाथ ठकाजी ढवळे हा १२०२ गुण मिळवून राज्यात तिसरा आला असून, ‘पोलीस उपअधीक्षक-सहायक पोलीस आयुक्त गट’ या पदावर त्याची निवड झाली आहे. सुधीर शिवाजी खेडकर हा १२०० गुण मिळवून राज्यात चौथा आला असून, ‘सहायक विक्रीकर आयुक्त गट अ’ या पदावर त्याची निवड झाली आहे. रत्नाकर ऐजिनाथ नवले हा ११९५ गुण मिळवून राज्यात पाचवा आला असून, ‘पोलीस उपअधीक्षक-सहायक पोलीस आयुक्त गट’ या पदावर त्याची निवड झाली आहे. नायब तहसीलदारपदासाठी निवड झालेल्यांमध्ये माधुरी अशोक डोंगरे ही पहिली आली  आहे.

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक विक्रीकर आयुक्त, गटविकास अधिकारी, वित्त व लेखा सेवा अधिकारी, सहायक वाहतूक अधिकारी, भूमी व अभिलेख आदी पदांसह १६२ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती