www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेनं मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादलाय. पण त्याचवेळी महापालिकेनं तब्बल आठ हजार १५ कोटी ८२ लाखांची थकबाकीच वसूल केली नसल्याचं उघड झालंय. मुंबई महापालिकेच्या या कारभारावर मुंबईकर संतप्त आहेत.
मुंबई महापालिकेनं नव्यानं लागू केलेल्या मालमत्ता करामुळे निवासी करदात्यांना दुप्पट तर व्यावसायिक गाळ्यांसाठी तीनपट वाढीव टॅक्स भरावा लागणार आहे. मात्र त्याचवेळी मुंबई महापालिकेनं मालमत्ता कराची ८ हजार १५ कोटी ८२ लाखांची थकबाकी वसूलच केलं नसल्याचं उघड झालंय.
शहरी भागात ४३१६ कोटी, पश्चिम उपनगरांत २६६९ कोटी तर पूर्व उपनगरांत १००४ कोटींची थकबाकी आहे. एकीकडे थकबाकी वसूल करायची नाही, आणि दुसरीकडे मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादायचा. महापालिकेच्या या कारभारावर मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केलीय.
जे मालमत्ता कर बुडवणारे आहेत, त्यांची नावं वर्तमानपत्रात जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केलीय. तर भाजपनंही यावरुन टीकेची संधी साधलीय. मुंबईत एकूण १८ लाख ५३ हजार मालमत्ता आहेत. त्यातल्या २६ टक्के लोकांनी मालमत्ता कर बुडवल्याचं उघड झालंय. मात्र या थकबाकीदारांवर महापालिकेनं कुठलीही कारवाई केलेली नाही.