पंढरपूरच्या विठोबाचे दागिने चोरीला!

कोट्यवधी भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या दागिन्यांतले मौल्यवान हिरे, मोती, माणिक लंपास झालेत. विधी व न्याय विभागाच्या अहवालातून ही माहिती पुढे आलीय. पण हे दागिने कुणी लंपास केले याबाबत कोणतीही माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्यानं विठ्ठलाचे दागिने नेले तरी कुणी ?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 22, 2013, 06:48 PM IST

संजय पवार, www.24taas.com, पंढरपूर
कोट्यवधी भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या दागिन्यांतले मौल्यवान हिरे, मोती, माणिक लंपास झालेत. विधी व न्याय विभागाच्या अहवालातून ही माहिती पुढे आलीय. पण हे दागिने कुणी लंपास केले याबाबत कोणतीही माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्यानं विठ्ठलाचे दागिने नेले तरी कुणी ? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेला पंढरीचा विठोबा.... गोरगरीब वारकऱ्यांच्या विठ्ठलाचा खजिना तसा मोठा. अनेक राजे महाराजांनी भेट म्हणून दिलेल्या मौल्यवान वस्तू आणि दागिने या खजिन्यात आहेत. पण धक्कादायक बाब अशी या अनमोल ठेव्यातले किंमती हिरे, माणिक, मोती आणि पाचू गायब झालेत. विधी व न्याय विभागाच्या एका अहवालातच तसं नमूद करण्यात आलंय. विठ्ठलाच्या दागिन्यांची तपासणी करावी अशी मागणी मंदिर समितीचे सदस्य वसंत पाटील यांनी केल्यानंतर वर्षभरापूर्वी विधी व न्याय खात्यानं केलेल्या छाननीत हिरे-मोती गहाळ झाल्याची बाब पुढे आली. विठ्ठलाच्या दागिन्यांतील 24 मोठे मोती, 24 हिरे, एक सप्तरंगी हिरा, 15 मोठे पाचू, आणि 10 माणिक गायब असल्याचं विधी व न्याय विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. या दागिन्यांची किंमत थोडथोडकी नाही, कारण ते पुरातन आणि मौल्यवान होते.

शिवाजी महाराजांपासून ते पेशवे, होळकर अशा राजे आणि संस्थानिकांनी विठ्ठलाला दान केलेला हा अनमोल खजिना. त्यातल्या हिरे-मोत्यांवर डल्ला मारला तरी कुणी? वारकरी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला या प्रश्नाचं उत्तर हवंय. 1985ला सरकारनं मंदिर ताब्यात घेतल्यापासून या दागिन्यांचा ताबा कार्यकारी अधिकारी असलेले उपजिल्हाधिकारी आणि व्यवस्थापक असलेले तहसिलदार यांच्याकडे असतो. तर मंदिराचा कारभार सात सदस्यांची समिती पाहते. अधिकारी मनमानी करतात असा सदस्यांचा आरोप आहे. त्यातूनच दागिन्यांची तपासणी करावी अशी मागणी पुढे आली होती. हा वाद काहीही असो पण कोटयवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाचे हिरे-मोती लुटले तरी कुणी? हा खरा प्रश्न आहे. कोणत्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात हे हिरे-मोती-माणिक गहाळ झाले याची माहिती द्यावी असं विधी व न्याय विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. त्याला वर्ष होत आलं, पण त्याची उत्तर दिलं की नाही याबाबत कुणीच बोलायला तयार नाही. सध्याचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्याकडून अद्याप माहिती मिळालेली नाही. तर मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी याबाबत कानावर हात ठेवले.
वारकऱ्यांसाठी तर हा भक्ती आणि भावनेचाही प्रश्न आहे. पुरातन काळातल्या या दागिन्यांची किंमत कोट्यवधी रुपये असल्यानं ते हडप केले गेले असावेत असा संशय वारकरी संघटना व्यक्त करतायत.... या निमित्तानं विठ्ठलाच्या सर्व दागिन्यांची तपासणी व्हावी, अन्यथा सरकारला न्यायालयात खेचू अशी धमकी वारकऱ्यांनी दिलीय.

पंढरपुरच्या विठ्ठलाच्या पुरातन मंदिराला शेकडो पोलिसांचा घेरा असतो. मंदिर समितीत अधिकारी आणि शेकडो कर्मचारी तैनात असतात. मग विठ्ठलाच्या मौल्यवान दागिन्यांना हात लावण्याची हिम्मत करणार तरी कोण? कुणाच्या कार्यकाळात हा प्रकार घडला ? अधिकाऱ्यांनी सरकारला अहवाल पाठवला असेल तर त्यात कुणाला जबाबदार धरलंय ? या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणून ज्यांच्याकडे या खजिन्याचा ताबा आहे त्यांनी हे उत्तर द्यायला हवं. अन्यथा विठ्ठलाच्या खजिन्यावर डल्ला मारणारे पंढरीचे लुटारू शोधून सरकारनं त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.