राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडण्यासाठी खास ट्रेन!

मुंबईच्या नव्या इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डोमेस्टिक एअरपोर्टला जोडणारी एक ‘विशेष जलद एसी ट्रेन’ चालवली जाणार आहे. एमएमआरडएनं याचा पूर्ण आराखडा बनवलाय. या प्रकल्पाचा खर्च जवळपास १२ हजार कोटी रुपये येणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2013, 03:30 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या नव्या इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि डोमेस्टिक एअरपोर्टला जोडणारी एक ‘विशेष जलद एसी ट्रेन’ चालवली जाणार आहे. एमएमआरडएनं याचा पूर्ण आराखडा बनवलाय. या प्रकल्पाचा खर्च जवळपास १२ हजार कोटी रुपये येणार आहे.
दिल्ली एअरपोर्टच्या मेट्रो एक्स्प्रेसच्या धर्तीवर मुंबई एअरपोर्ट आणि शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एक विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ‘झी २४ तास’ला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्ट आणि नव्याने होणाऱ्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला जोडणारी एक फास्ट एसी ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनचा स्पीड हा ताशी १०० किमी असणार आहे. ही ट्रेन तीन-चार स्टेशन्सवर थांबत ४३ किमीचं अंतर साधारण ४५ मिनिटांत पूर्ण करेल. या प्रकल्पासाठी १२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याची ‘एमएमआरडीए’ची इच्छा आहे.

सुपरफास्ट ट्रेनचा हा प्रकल्प पहिला असा प्रकल्प असेल ज्यात पश्चिम आणि मध्य मुंबईच्या उपनगरांना नवी मुंबईशी जोडलं जाईल. अंधेरीपासून प्रस्तावित एअरपोर्टपर्यंत ही ट्रेन चालवली जाईल. काही ठिकाणी एलिव्हेटेड ट्रॅक्सवरुनही ही ट्रेन चालवली जाईल. खासगी कंपन्यांच्या सहकार्याने हे प्रोजेक्ट पूर्ण करण्याची सरकारची योजना आहे. मुंबईत चाललेल्या इतर रेल्वेच्या कामांपेक्षा हा प्रकल्प पूर्णपणे वेगळा असेल. ‘एमएमआरडीए’नं या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे आणि तो लवकरच सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.