काँग्रेस बॅकफूटवर !

मुंबईची सलग सत्ता उपभोगणाऱ्या य़ुतीला खाली खेचण्याची कॉंग्रेसने पूर्ण तयारी केली होती. पण काँग्रेसच्याच अजित सावंतानी बंड करत थेट काँग्रेसच्या तिकीटवाटपातला घोळ मुंबईसमोर आणला.

Updated: Feb 3, 2012, 12:53 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईची सलग सत्ता उपभोगणाऱ्या य़ुतीला खाली खेचण्याची कॉंग्रेसने पूर्ण तयारी केली होती. पण काँग्रेसच्याच अजित सावंतानी बंड करत थेट काँग्रेसच्या तिकीटवाटपातला घोळ मुंबईसमोर आणला. सावंतावर निलंबनाची कारवाई झाली खरी पण उमेदवारांच्या यादीतला घसरलेला मराठी टक्का मात्र कॉंग्रेसला लपवता आला नाही.

 

गेल्या बारा वर्षापासून  याच मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदापासून वंचित असणारी काँग्रेस यंदा मात्र भलतीच खुष होती. महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेना भाजप युतीला खड्ड्यांच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन कोंडीत पकडता येईल या आशेवर असणाऱ्या काँग्रेसला प्रत्यक्षात मात्र घरचा आहेर मिळाला. काँग्रेसचे सरचिटणीस अजित सावंत यानी पक्षात पैसे घेऊन तिकीट वाटली जातात असा आरोप करत एकच खळबळ माजवून दिली. अजित सावंत यांनी संजय निरुपम आणि कृपाशंकर यांच्यावर तोफ डागत परप्रांतियाना उमेदवारी विकली गेली आहेत हा थेट आरोप केला. सावंताच्या या आरोपाने बॅकफुटवर गेलेल्या कॉंग्रेसला सावंतावर निलंबनाची कारवाई करावी लागली. काँग्रेसमध्ये मराठी कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप अजित सावंतांनी कारवाई होताच केला.

 

मराठी मतं नाहीत म्हणून मराठी नेतृत्व नाही, आणि मराठी नेतृत्व नाही म्हणून मराठी उमेदवार नाही अशी टीका आता खुद्द क़ॉग्रेसचेच कार्यकर्ते करु लागले आहेत. एकीकडे सावंत कृपाशंकर सिंहांविरोधात मराठी कार्ड चालवत असताना खासदार संजय निरुपम आणि खासदार प्रिया दत्त यांच्या समर्थकांना डावलल्यानं ते नाराज झालेत. नेते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधला असंतोष उफाळून आल्यानं कॉंग्रेस बॅकफूटवर गेली आहे. कार्यकर्ते मराठीच्या मुद्यावर काँग्रेसला घरचा आहेर देत असले तरी जाहीरनाम्यात काँग्रेसनं मराठीला प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोपही आकडेवारीसह पक्षानं फेटाळला आहे.

 

 

राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्यानं काँग्रेसची स्थिती यावेळी चांगली असेल असं वाटलं होतं. पण नेत्यांच्या गोतावळ्याला प्राधान्य आणि गटबाजी यामुळे मुंबई जिंकण्याचं स्वप्न वाटतं तितकं सोपं नाही. काँग्रेसची मदार पारंपरिक मिळणाऱ्या मराठी मतांबरोबरच दलित, मुस्लिम आणि दक्षिण तसंच उत्तर भारतीय मतांवर आहे.  विरोधकांबरोबरच स्वकीयांनीही दंड थोपटल्यानं पक्षासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. मराठी मतांसाठी शिवसेना आणि मनसेत स्पर्धा असली तरी अन्य मतांवर काँग्रेस यावेळी किती मजल मारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.