www.24taas.com, अंबरनाथ
कमी मार्क्स मिळाले, म्हणून निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हाती शाळा सोडण्याचा दाखला देण्याचा अजब प्रताप अंबरनाथमधल्या शाळेनं केला आहे. सुशिलाताई दामले शाळेकडून हे संतापजनक कृत्य घडलं आहे. यामुळं संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षकांना शाळेतच कोंडून ठेवलं. ऐन निकालाच्या दिवशी घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.
केवळ डोनेशन उकळण्यासाठी शाळा चालवली जाते, असा आरोप करत संतप्त पालकांनी शाळेतच ठिय्या आंदोलन पुकारलं. कमी मार्क्स मिळाल्याचं सांगत मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आल्याचं शाळेच्या प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.
याच शाळेत पहिली ते चौथीच्या चार तुकड्या चालवल्या जातात. मात्र, पाचवीसाठी केवळ एकच वर्ग आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पाचवीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल, असा फतवा शाळेकडून काढण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं आहे.
त्यामुळे अनेक मुलांना या शाळेचे दरवाजे बंद होतात. गेल्या अनेक वर्षांपासून पालक प्रशासनाबरोबर भांडताहेत. मात्र, संस्थाचालक पालकांना दाद देत नसल्याचं आढळून आलं आहे. या सगळ्याचा संताप अनावर झाल्याने अखेर पालकांनी शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोरच ठिय्या आंदोलन पुकारलं.