'राज'कारण (ठाकरे) पॉवरफुल

महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं महाराष्ट्राच्य़ा राजकारणात आपली वेगळं स्थान निर्माण केलं आहे. महापालिकेच्या निवडणूकीत मनसेची ताकद सर्वच राजकीय पक्षांना कळाली आहे. मनसे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू का ठरतोय. राज ठाकरेंची प्रत्येक खेळी का यशस्वी ठरत आहे.मनसे राज्याच्या राजकारणाला भविष्यात कलाटणी देणारा का, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत, पॉवरफुल राजकारणात.

Updated: Mar 20, 2012, 12:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं महाराष्ट्राच्य़ा राजकारणात आपली वेगळं स्थान निर्माण केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची ताकद सर्वच राजकीय पक्षांना समजली आहे. मनसे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू का ठरतोय, राज ठाकरेंची प्रत्येक खेळी का यशस्वी ठरत आहेत. मनसे राज्याच्या राजकारणाला भविष्यात कलाटणी देणार का, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, पॉवरफुल राजकारणात.

 

 

 

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सर्वच राजकीय पक्षांना आपल्या राजकीय शक्तीची ओळख करुन दिला आहे. नुकतेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेनं सत्ता काबीज केली तर पुण्यात विरोधपक्ष पदाचा मान मिळवला. कोकणातील खेड नगरपरिषद आणि यवतमाळमधील वणी नगरपरिषदेमध्येही एकहाती सत्ता आहे. तर एका पंचायत समितीत निर्विवाद वर्चस्व आहे. औरंगाबादमध्येही मनसेने चांगला जम बसवला आहे. या कामगीरीमुळे मनसे राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचला आहे.

 

 

शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंनी महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाला जन्म दिला होता. या घटनेला आता सात वर्ष उलटून गेलीत. तर राज ठाकरेंची नवनिर्माण सेना नुकतेच सहा वर्षांची झालीय. पण अवघ्या सहा वर्षांत या पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आणि त्यामुळंच आता मनसेला टाळून राजकारण करणं कोणत्याच राजकीय पक्षाला जमणार नाही हे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकेच्या निवडणूकीत राज ठाकरेंनी दाखवून दिलं आहे.

 

 

नाशिकमध्ये तर मनसेनं भाजपच्या मदतीनं सत्ता मिळवलीय. तर पुणे महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून स्थान पटकावलं आहे.  महापालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू बनत चालला असल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केला.  पण शिवसेना- भाजप युतीनं पुन्हा एकदा सत्ता खेचून आणण्यात यश मिळवलं. तिकडे ठाण्यात जादूई आकडा गाठण्यात शिवसेना- भाजप युतीची चांगलीच दमछाक झाली होती. कारण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अघाडीनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले होते. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केल्यामुळे युतीचं धाबं दणाणलं होतं. त्यामुळेच फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला होता. धास्तावलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन मग पाठिंब्यासाठी विनवणी केली आणि राज ठाकरेंनी शिवसेना- भाजप य़ुतीला पाठिंबा देण्याची घोषणा करून ठाण्यातलं चित्र पालटवलं.राज ठाकरेंच्या या खेळीमुळे ठाण्यात सत्ता मिळविण्याचं काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं स्वप्न भंगलं. शिवसेनेला दिलेल्या या पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेना मनसेला साथ देईल अशी त्यांची अपेक्षा होती.

 

 

शिवसेनेचाच  मुखभंग

राज ठाकरेंच्या या राजकीय खेळीमुळे शिवसेना-मनसे एकत्र येणार का याची चर्चा सुरु झाली. पण ठाण्यात पाठिंबा घेणा-या उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये मात्र मनसेच्या सत्तेच अडथळे आणले.  पण राज ठाकरेंनी भाजपची मतं तर मिळवलीच, पण राष्ट्रवादीनंही तटस्थ राहून मनसेला मदत केली. मनसेला अपशकुन करणा-या शिवसेनेचाच त्यामुळे मुखभंग झाला आणि त्याचे परिणाम आता ठाण्यातही भोगावे लागतायत. कारण शिवसेनेच्या नाशिकमधल्या भूमिकेचा वचपा काढण्यासाठी मनसेनं ठाण्यातला पाठिंबा काढून घेतला, त्यामुळे आता स्थायी समितीसह अन्य महत्वाच्या पदांसाठी शिवसेनेला निकराची झुंज द्यावी लागतेय..मनसेची राजकीय घौडदौड अशीच सुरु राहिल्यास आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेला टाळून कोणालाच राजकारण करता येणार नाही हे ही तेव्हडंच खरं.