www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर भाजपला बहुमत मिळेल असं चित्र असल्यामुळे भाजप आता नवं सरकार स्थापण्याच्या रणनितीत गुंतलंय. गांधीनगरमध्ये नरेंद्र मोदींची भेट घेण्याआधी आज सकाळपासूनच वरिष्ठ भाजप नेत्यांचा दिल्लीत भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय.
अमित शहा यांनी अरुण जेटलींची भेट घेतली. तर नितीन गडकरी आणि पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सुषमा स्वराज यांची भेट घेतली. नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आल्यास सुषमा स्वराज यांची त्या सरकारमध्ये नेमकी काय भूमिका असेल तसंच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे नेमकी कुठली भूमिका सांभाळतील याबाबतीत स्वराज आणि राजनाथ यांच्या चर्चा झाली.
या चर्चेनुसार जेटली, गडकरी आणि राजनाथ सिंह नरेंद्र मोदींची गांधीनगरमध्ये जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये सरकार बनवणं आणि भविष्यातल्या योजनांसंदर्भातल्या रणनितीसंदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नरेंद्र मोदी आणि एआयएडीएमकेच्या जयललिता यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे मोदी पंतप्रधानपदी आरुढ झाले तर जयललिता त्यांना समर्थन देतील असे संकेत एआयएडीएमकेचे नेते के मलाय सामी यांनी दिलेत.
नवीन पटनायक बीजेडी भाजप आणि काँग्रेसपासून समान अंतरावर आहे. अद्याप कोणालाही पाठिंबा देण्याचा निर्णय झालेला नाही असं बीजेडीचे नेते दामोदर रौऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळेल असं रिपब्लीकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी म्हटलय. एवढच नाही तर मंत्रीपद मिळ्यानंतर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं साहित्य त्यांच्या बंगल्यातून बाहेर काढू, असं म्हटलंय. कोल्हापूरात पत्राकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलय.
भाजप नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांकडे काय पदं असतील याच्या तयारीला लागली आहे. भाजपच्या या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी टीका केली आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल यात काही शंका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय.
तसंच आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडलो असल्याची प्रतिक्रिया पटेल यांनी दिलीय. तसंच काहीही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस युपीएसोबतच असतील असंही त्यांनी म्हटलंय. तर देशात स्थिर सरकार यावं हीच राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. मात्र एनडीए सरकार सत्तेत आल्यास पक्ष पाठिंबा देणार असल्याची अफवा असल्याचं स्पष्टीकरण, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी दिलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.