लोकसभा निवडणूक : थेट वाराणसीतून खास रिपोर्ट

सध्या देशभरात लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ म्हणजे वाराणसी... इथून निवडणूक लढवताहेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी. काशी विश्वेश्वराचा निवास असलेली वाराणसी सध्या निवडणुकीच्या रंगात रंगली आहे... वाराणसीच्या हवेचा वेध घेणारा झी 24 तासचा खास रिपोर्ट. थेट वाराणसीतून.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2014, 10:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
सध्या देशभरात लक्षवेधी ठरलेला मतदारसंघ म्हणजे वाराणसी... इथून निवडणूक लढवताहेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी. काशी विश्वेश्वराचा निवास असलेली वाराणसी सध्या निवडणुकीच्या रंगात रंगली आहे... वाराणसीच्या हवेचा वेध घेणारा झी 24 तासचा खास रिपोर्ट. थेट वाराणसीतून.
वाराणसी. सिटी ऑफ गॉड अशी ओळख असणारं शहर. इथले लोक याला बनाsssरस म्हणतात. बनारसी पानाप्रमाणंच इथली निवडणूकदेखील आता प्रत्येकाच्या तोंडी रंगायला लागलीय. इथला प्रत्येक सामान्य माणूस सध्या राजकीय विश्लेषक झालाय. त्यामुळं निवडणुकीचा विषय काढला की प्रत्येकाच्या तोंडून अशी रसवंती वाहायला लागते.
बनारसची हिच तर खासियत आहे. आपला राजकीय ओढा कोणाकडे आहे हे इथं कुणीच लपवून ठेवत नाही. सगळं काही खुलेआम आणि जगजाहीर. इथलं राजकीय वातावरण, प्रचार, कोण निवडून येणार याविषयी आपापली मतं बनारसी नागरिक खुलेआम आणि जाहीरपणे मांडताहेत. झाडूवाला सांगतो, अब देखिए भाई, ये तो राजनिती है. महागाई नकोशी झाली आहे. तर दुसरा म्हणतो भाजपा तो कुछ काम का नही. तिसरा सांगतो जातीवाद बहुत करते हैं यहाके लोग. सबको मुसलमानके वोट चाहिए.
काँग्रेसचे उमेदवार अजय राय हे बनारसचेच आहेत. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे मात्र बाहेरून आलेले उमेदवार आहेत. या मुद्द्याकडं बघण्याचा बनारसवासियांचा दृष्टीकोन मात्र वेगळा आहे. वाराणसी हा भारतातला सर्वात लक्षवेधी मतदारसंघ. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे दोन हेवीवेट नेते आमनेसामने आहेत. त्याचसोबत पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमधले भाजपचे एकेकाळचे मंत्री अजय राय सध्या काँग्रेसच्या तिकीटावर उभे आहेत. समाजवादी पक्षाकडून कैलाश चौरसिया तर बसपाकडून विजय जैस्वाल आपलं नशिब आजमावतायत. मात्र काँग्रेस आणि आप यांच्यात खरी लढाई ही दुसऱ्या नंबरसाठी असल्याचं बनारसवासियांचं म्हणणं आहे.
वाराणसीकर वृद्ध नागरिक सांगतात, दोन नंबरवर अजय राय आणि तिसऱ्या नंबरवर केजरीवाल राहतील. तर दोन तरूण सांगतात, अरविंद केजरीवालने दिल्ली में मौका मिलकर भी कुछ नही किया, मोदीजीने गुजरात मे करके दिखाया है. आगे क्या होता है तो देखेंगे.
कौमी एकता दलाचे नेते आणि माफिया डॉन मुख्तार अंन्सारी यांनी पुढं केलेला मदतीचा हात काँग्रेसनं हातात घेतलाय. काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या भावाच्या हत्येचा मुख्तार अंसारी यांच्यावर आरोप आहे. असं असूनही काँग्रेसनं अंन्सारींशी हातमिळवणी केलीय. मुस्लिम मतांचा विचार करूनच काँग्रेसनं हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र याचा काँग्रेसच्या प्रतिमेवर परिणाम होईल, असं बनारसवासियांचं मत आहे.
1991 पासून वाराणसी हा भाजपचा गड आहे. अपवाद केवळ 2004 चा. मात्र देशातले दोन दिग्गज नेते वाराणसीतल्या आखाड्यात उतरल्यामुळं कुस्तीची रंगत मात्र चांगलीच वाढलीय. लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहचली असताना मोदी विरूद्ध गांधी संघर्ष शिगेला पोहचला आहे. सुरूवातीला मोदी विरुद्ध राहूल असा रंगलेला हा सामना मतदान सुरू झाल्यानंतर अचानक मोदी विरूद्ध प्रियांका असा रंगला. मात्र आता संघर्षानं वैयक्तीक पातळी गाठली असून थेट जातीपर्यंत पोहचला. मोदींनी कोणत्याही सभेत थेट प्रियांका गांधींवर टीका करणं टाळलं असलं, तरी या निवडणुकीत त्यांचा खरा सामना रंगला तो प्रियांका गांधींशीच.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वडेरांवर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचे आरोप केले आणि लोकसभा निवडणुकीत मोदी विरूद्ध राहुल गांधी रंगलेला सामना अचानक मोदी विरुद्ध प्रियांका गांधी असा सुरू झाला. प्रियांका गांधींनी मोदींवर पलटवार करत या लढ्याला आपण सज्ज असल्याचा इशाराच दिला.

मोदींनी वडेरांनंतर आपला मोर्चा पुन्हा राहुल आणि सोनिया गांधींकडे वळवला. शहजादे आणि माताश्रींना जनतेची नव्हे तर सत्तेची काळजी असल्याचं सांगत राहुल आणि सोनिया गांधींची खिल्ली उडवली. यावर प्रियांकांनी मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला.

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*