www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक 2014 च्या मतदानाचे नऊ टप्पे पार पडल्यानंतर आहे प्रतिक्षा आहे ती निकालाची... म्हणजे 16 मे या तारखेची... हीच प्रतिक्षा इतरांसाठी जशी महत्त्वाची आहे तशीच ती सट्टेबाजांसाठीही महत्त्वाची ठरतेय... कोट्यावधींची उलाढाल सट्टेबाजारात या निमित्तानं होण्याची शक्यता आहे. या सट्टेबाजारात आत्तापर्यंत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त भाव खाल्ला. पण, जसजसा निकालाचा दिवस जवळ येऊ लागलाय तसतसा सट्टेबाजांचा नरेंद्र मोदींवरचा विश्वास डळमळत चालल्याचं दिसून येतंय.
मोदी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार की नाही? यावर हा सट्टा लागलाय. काही दिवसांपूर्वीपर्यंत सट्टेबाज मोदींनाच पुढच्या पंतप्रधान म्हणून पाहत होते. पण, आता मात्र तेच यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. वाराणसीमध्ये ‘आप’चे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या जबरदस्त प्रचारामुळे मोदींचा भाव डळमळल्याचं ते सांगतायत. पण, गुजरातमध्ये मात्र मोदींचा भाव कायम आहे.
काही सट्टेबाजांच्या मते, भाजप मुख्य पक्ष म्हणून सत्तेवर आलं तरी मोदींची पंतप्रधान बनण्याची शक्यता कमीच आहे. निवडणुका सुरू होण्यापूर्वीपर्यंत सट्टेबाजारात मोदींचा भाव चांगलाच वधारलेला. पण, जसजसं मतदान झालं तसतसा त्यांचा भाव उतरत गेला.
तसंच वाराणसीमध्ये केजरीवाल यांची चर्चा जोरावर आहे. ‘आप’चे लोक प्रत्येक घराघरांत पोहचलेत. ही गोष्टच वाराणसीहून आलेल्या काही कार्यकर्त्यांनीदेखील मान्य केलीय. परंतु, गुजरातचा सट्टाबाजार मात्र अजुनही मोदींच्याच नावावर आहे.
तर मोदींच्या नावावरचा डाव कायम असल्याचं सांगत काही सट्टेबाजांनी भाजपला मिळणाऱ्या जागां मात्र शेवटी शेवटी कमी होत असल्याचं सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.