निवडणूक लढवणारे राज पहिले ठाकरे, उद्धवचं काय?

ठाकरे घराण्यात आजवर कोणीही निवडणूक लढवली नव्हती. सत्ता केंद्र ठाकरेंनी आपल्याकडे ठेवत राजकारण केलं. याला ना अपवाद ठरले बाळासाहेब ना त्यांची पुढची पिढी.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 1, 2014, 10:46 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ठाकरे घराण्यात आजवर कोणीही निवडणूक लढवली नव्हती. सत्ता केंद्र ठाकरेंनी आपल्याकडे ठेवत राजकारण केलं. याला ना अपवाद ठरले बाळासाहेब ना त्यांची पुढची पिढी.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं वादळ. भूमीपुत्रांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेनं 1967 साली ठाणे पालिकेवर आणि 1968 मुंबई महापालिकेवर भगवा फडकवला.. विधानसभेत शिवसेनेचे आमदार पोहचले.. मुंबईला सेनेचा महापौर मिळाला.. अनेक तरुण नेते बनले.. मोठमोठ्या पदावर पोहचले.. मात्र स्वतःला सत्तेच्या खुर्चीपासून दूर ठेवत बाळासाहेबांनी मुलुखमैदानी तोफांनी महाराष्ट्र जिंकला.
बाळासाहेबांची हीच भूमिका साऱ्या देशानं 1995 ते 99च्या काळात अनुभवली. महाराष्ट्राच्या विधानसभेवर 1995 साली शिवसेना-भाजप युतीची सत्ता आणि भगवा फडकला. स्वतःकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा घेण्याची संधी चालून आली असताना त्यांनी मनोहर जोशींच्या खांद्यावर ती जबाबदारी सोपवली, असं असलं तरी या सरकारचे रिमोट कंट्रोल बाळासाहेब होते असा आरोप त्यावेळी झाला.
आयुष्यभर स्वतःला बाळासाहेबांनी निवडणूक आणि सत्तेच्या राजकारणापासून दूर ठेवलं. त्यांचा हाच कित्ता त्यांची पुढची पिढी गिरवतेय. बाळासाहेबानंतर शिवसेनेची सूत्रं हाती घेतलेल्या उद्धव ठाकरेंनीही आजवर स्वतःला निवडणूकीपासून दूर ठेवलंय. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशामुळे उद्धव ठाकरेंनी भविष्यात महाष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं अशी मागणी होतेय. खुद्द उद्धव यांनीही शिवसैनिकांची ही इच्छा बोलून दाखवलीय.
तर तिकडे बाळासाहेबांकडून राजकारणाचे बाळकडू घेतलेल्या राज ठाकरे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेची स्थापना केली.. 2009 च्या निवडणुकीत राज यांच्या करिष्यामुळे मनसेचे तेरा आमदार विधानसभेत पोहचले.. मात्र राज यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून चार हात दूर राहणं पसंत केलं..
मात्र आता सत्तेची समीकरणं बदललीत.. लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी आता स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.. अशी घोषणा करुन निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरलेत..
आता कृष्णकुंजवरील एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला असताना मातोश्रीवरही असा काय निर्णय होतो का? याकडं साऱ्यांच्या नजरा लागल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.