www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. तर कोकणात सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे लक्ष आहे. नीलेश राणेविरूद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत होत आहे.
सकाळपासून मतदानाला चांगली सुरुवात झाल्याने राज्यातही मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील (१२), मराठवाडा (सहा) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणातील एक अशा १९ मतदारसंघांत मतदान होत आहे. गारपीटीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान या पट्टय़ातच झाले होते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना काही प्रमाणात फटका बसू शकतो.
शेतकऱ्यांची मते मागण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारात पॅकेजवर भर दिला. तर पश्चिम महाराष्ट्रात नरेंद्र मोदी घटक हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. मोदी यांच्या सभांना चांगली गर्दी झाली होती. याउलट राहुल गांधी यांच्या सभांना मोदींएवढा प्रतिसाद मिळाला नाही. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी सर्व मतदारसंघांचा दौरा करून मोदी यांनाच लक्ष्य केले होते.
राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहा मतदारसंघांमध्ये सरासरी 62.36 टक्के मतदान झाले होते. देशात आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यात सर्वत्रच चांगले मतदान झाले. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मतदान वाढेल, अशी चिन्हे आहेत. सर्वाधिक लक्षणीय लढत ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात होणार आहे. नीलेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेली असहकाराची भूमिका, काही काँग्रेसजनांचा विरोध यामुळे पुत्राला निवडून आणण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांची सारी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बीडमध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनी जोर लावला. मुंडे यांना राज ठाकरे यांचा पाठिंबा घ्यावा लागल्याने मुंडे यांच्यासाठी लढाई सोपी नाही हाच संदेश त्यातून गेला.
राष्ट्रवादीची सारी मदार ही पश्चिम महाराष्ट्रातील सात मतदारसंघांवर आहे. गेल्या वेळी नगर, मावळ, कोल्हापूर, शिरुर या हक्काच्या जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या होत्या. यंदा शिरुरचा अपवाद वगळता अन्य तीन जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा राष्ट्रवादीने निर्धार केला आहे. त्यामुळे 16 मेकडे लक्ष आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.