www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोदी मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार हातात घेणाऱ्या सुषमा स्वराज या ‘देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री’ ठरल्यात.
केवळ २५ व्या वर्षी हरियाणा सरकारमध्ये सगळ्यात तरुण कॅबिनेट मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी राजकारणाच्या क्षेत्रात आपलं अस्तित्व नोंदवलं होतं. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि देशातील कोणत्याही राजकीय पक्षातील पहिल्या महिला प्रवक्ता म्हणूनही त्यांच्या नावावर नोंद आहे... आणि आता तर ६२ वर्षीय सुषमा स्वरजा भारतीय प्रवासी प्रकरणांतील मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आलाय.
सुषमा स्वराज केंद्रीय कॅबिनेटमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण असं मंत्रालय समजलं जाणारं परराष्ट्र मंत्रालयाचा कारभार सांभाळणार आहेत... तेही अशा वेळी जेव्हा भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रभावानं भारताला महत्त्वाच्या देशांच्या रांगेत नेऊन बसवलंय. संयोगानं परदेशी प्रकरणांच्या मंत्रायातील परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यादेखील महिला आहेत.
सुषमा १९७७ मध्ये केवळ २५ वर्षांच्या असताना सगळ्यात तरुण कॅबिनेट मंत्री म्हणून पुढे आल्या होत्या. त्यांनी हरियाणात शिक्षण मंत्रालयाचा कारभार हाताळला होता. सुषमा १९७९ मध्ये भाजपच्या हरियाणाच्या अध्यक्ष बनल्या होत्या. तसंच त्यांना श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या संसद पुरस्कारानंदेखील गौरविण्यात आलंय. सुषमा स्वराज या सात वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्यात.
सुषमा यांनी १९९६ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून सूचना तसंच प्रसारण मंत्रालयाचा कारभार हाताळला होता. १९९८ मध्ये त्यांनी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कारभार हातात घेतला होता. यासाठीच त्यांनी वाजपेयी यांच्या पुढच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.