www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित झालाय. मोदींनंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण होणार विराजमान? या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदीबेन पटेल.
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार आनंदीबेन पटेल सध्या गुजरातच्या महसूल मंत्री आहे आणि त्या मोदींच्या खूप जवळील व्यक्ती मानल्या जातात. मात्र पटेल यांचं मोदींचे विश्वसनीय सहकारी अमित शहा यांच्यासोबत विशेष असं पटत नाही. अशात मोदींना या दोघांनाही खूश करण्याची जबाबदारी आहे. दोघांनाही विशेष पदे द्यावे लागतील.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आनंदीबेन यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळू शकते आणि अमित शहा यांना पीएमओमध्ये मंत्री पद मिळू शकतं. मोदी तर त्यांना पक्षाची जबाबदारीही सोपवण्यास तयार आहेत. मात्र त्यासाठी अमित शहा अजून ज्युनिअर आहेत. अशात पीएमओमध्ये मंत्रीपद त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि ते मोदींच्या जवळही राहतील.
नरेंद्र मोदी दोन ठिकाणांहून लोकसभा निवडणूक लढवत आहे. अशातच जर मोदी दोन्ही जागांवरून जिंकले तर ते वाराणसीची जागा ठेवून बडोद्याची सोडतील आणि अमित शहा त्यांच्या जागी लढतील, असंही बोललं जातंय. अमित शहा सध्या अहमदाबादचे आमदार आहेत.
गुजरातचे ऊर्जा मंत्री सौरभ पटेल सध्या बडोद्याचे आमदार आहेत आणि मोदींच्या प्रचाराची धुरा सध्या त्यांच्या हाती आहे. मोदी सौरभ पटेलांच्या कामानं चांगलेच खूश आहेत, कारण मंत्री म्हणूनही त्यांचं काम उत्तम आहे. अशा परिस्थितीत सौरभ पटेल यांना राज्यसभेद्वारे संसदेत पोहोचवू शकतात. मात्र त्यासाठी अरूण जेटली अमृतसर लोकसभा मतदारसंघातून विजयी होणं गरजेचं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जोपर्यंत गुजरातमध्ये काही चांगली संधी मिळत नाही, तोपर्यंत अमित शहा दिल्लीतच राहतील. आता हे सर्व गणित १६ मेच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.