पाहून मुंबईचा विकास, विरोधकांना होतोय त्रास

राहुल शेवाळे महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची माहिती आयुक्तांना १५ दिवस अगोदर देण्याचा नियम काही नवा नाही. यापूर्वी अशा प्रकारे वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

Updated: Oct 22, 2011, 02:55 PM IST

राहुल शेवाळे, स्थायी समिती अध्यक्ष

मुंबई महापालिका

 

महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची माहिती आयुक्तांना १५ दिवस अगोदर देण्याचा नियम काही नवा नाही. यापूर्वी अशा प्रकारे वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आताच हा विषय काढून विनाकारण राजकारण केले जात आहे. दरम्यान, आयुक्तांनी उद्घाटनांना चाप लावला, अध्यादेश काढला या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. सध्या आयुक्त परदेशात असून उपायुक्त जलोटा यांनी हे आदेश काढले आहेत.

 

महापालिकेच्या सर्व उद्घाटनांना मा. उद्धवजी ठाकरे असतात, असा विरोधक कांगावा करीत आहेत. या बद्दल बोलायचे झाले तर मा. उद्धवजी ठाकरे हे पक्षाच्या प्रमुख पदावर आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी जो वचननामा जाहीर केला होता. त्याप्रमाणे, शिवसेना मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विकास कामे करीत आहे. त्यामुळे झालेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचावी, यासाठी उद्धवजी ठाकरेंनी उद्घाटन केले तर त्यात गैर काय?

 

उद्घाटन सोहळ्याला कोणाला बोलवायचे, हा मुंबईच्या महापौर यांचा प्रश्न असतो. त्यांना मा. उद्धवजी ठाकरे योग्य वाटत असतील तर ते त्यांनाच बोलावतात. या प्रश्नावर विरोधक बोंब मारत आहेत. पण मला मनसे आणि काँग्रेसला विचाराचे आहे. विक्रोळीला महापालिकेच्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मनसेने त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना बोलावले होते. तसेच वांद्रे वरळी सी-लिंकच्या उद्घाटनावेळी काँग्रेसनेही सोनिया गांधी यांना बोलावले होती की नाही. ते काही नाही. आम्ही केलेल्या विकासकामांमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय, त्यांना काही मुद्दा नाही म्हणून आता हे बोंब मारण्याचे काम आहे.

 

उद्घाटनाच्या ठिकाणी भगवे झेंडे लावतात, या संदर्भात विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर एकच सांगावेसे वाटते. मनसेने विक्रोळीला आणि काँग्रेसने सी-लिंकला उद्घाटनाचा कार्यक्रम लावला तेव्हा काय काळे झेंडे लावले होते का? त्यांनी त्यांच्या पक्षाचेच झेंडे लावले होते ना? म्हणजे स्वतः करायचे तेव्हा काही नाही आणि आम्ही केल्यावर बोंब मारायची, हे कोणते राजकारण. खरं सांगायचं तर, शिवसेनेने उद्घाटनाच्या ठिकाणी भगवे झेंडे लावले नाहीत. उद्घाटन स्थळापासून बऱ्याच अंतरावर झेंडे लावले होते. मला वाटते त्यात काही गैर नाही.

 

शिवसेनेतर्फे सध्या जे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आले, ते काही काल परवा सुरू झालेल्या कामाचे केलेले नाही, हे प्रथम मी इथं स्पष्ट करू इच्छितो. गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरू असलेल्या विकासकामांची आता पूर्तता झाली आहे. त्यामुळे, हे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आले आहे. यात महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही उद्घाटन करत नसल्याचेही जनतेने लक्षात घ्यावे.

 

काँग्रेसने मुंबईत कोणत्याही प्रकारची विकास कामे केली नाहीत. त्यामुळे त्यांना उद्घाटनाची संधीच मिळत नाही. त्यांचा खोटारडेपणा नुकताच उघडकीस आला. त्यांनी शहराच्या विविध भागात सुधारलेल्या रस्त्यांच्या स्थितीबद्दल स्वतःला श्रेय घेण्याचे प्रकार सुरू केले आहे. दरम्यान, विकासकामे आणि उद्घाटनांवर मनसे आणि काँग्रेसला बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. मुंबई महापालिकेचा जेव्हा अर्थसंकल्प मंजूर झाला, त्यावेळी मनसे आणि काँग्रेसमधील एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. शिवसेनेने गेल्या पाच वर्षात जो विकास केला आहे. तो पाहून विरोधकांना त्रास होत आहे.