www.24taas.com, अहमदाबाद
गुजरात विधानसभेच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय. दुपारी १ वाजेपर्यंत ३८ टक्के मतदान झालय. ९५जागांसाठी हे मतदान होतय. आज नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांचं भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
सुमारे दोन कोटी मतदार आपलं बहुमूल्य मत आज देणार आहेत. एकूण ८२०उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मध्य गुजरातमधील पाच जिल्ह्यातील ४० जागा, उत्तर गुजरातमधील पाच जिल्ह्यातील ३२ जागा, अहमदाबाद शहरातील १७ जागा आणि कच्छ जिल्ह्यातील सहा जागा अशा एकूण ९५ जागांसाठी आज मतदान होत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्याच्या मतदानालाही मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. मतदानासाठी सकाळीच उमेदवार घराबाहेर पडलेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. गुजरातमध्ये थंडी असतानाही त्याचा मतदानावर कोणाताही परिणाम झालेला दिसत नाही. अनेक दिग्गज नेत्यांनीही सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. शिवाय त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट यांनीही मतदानाचा हक्क बजावला.नरेंद्र मोदी यांनी मतदानाला येताना मोठं शक्तीप्रदर्शन केल्याची तक्रार काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडं केलीये. नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या मणिपूर मतदारसंघाकडं सर्वांचंच लक्ष लागलय.