मुंबई : पेरू हे आपल्यातील अनेकांचं आवडतं फळ आहे. काहींना कडक तर काहींना अगदी पिकलेले पेरू खायला आवडतात. काहींना मात्र पेरू खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास खरं तर पेरूमुळे नाही, तर पेरुतील बियांमुळे होतो. ज्यांना हा त्रास होत असेल त्यांनी पेरुच्या बिया काढून केवळ मांसल भाग खाणे फायद्याचे ठरते.
पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे फळ खाणे त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम करते. फॉलिक अॅसिड, पोटॅशिअम, तांबे आणि मँगनीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरुचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात.
काही लोक पेरू ठेचून त्यात थोडे मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावतात. त्वचेला यामुळे उजाळा येऊ शकतो.
पेरुंमध्ये 'जीवनसत्व के' मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे त्वचेवर उमटणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यांवर ते उपाय करता येतात. पेरुचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यात मदत करते.