प्लास्टिक भांड्यातील चहा, जेवण धोकादायक?

प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेणारे आणि प्लास्टिक कोटेड भांड्यामध्ये जेवण करणाऱ्यांनो सावधान ! अशा कपने चहा घेणारे आणि भांड्यामध्ये जेवण करणारे लोक नपुंसक होऊ शकतात, असे संशोधनातून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 6, 2012, 12:59 PM IST

www.24taas.com,मुंबई
प्लास्टिकच्या कपमध्ये चहा घेणारे आणि प्लास्टिक कोटेड भांड्यामध्ये जेवण करणाऱ्यांनो सावधान ! अशा कपने चहा घेणारे आणि भांड्यामध्ये जेवण करणारे लोक नपुंसक होऊ शकतात, असे संशोधनातून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
कंटाळा गालविण्यासाठी किंवा ताजेतवाण होण्यासाठी चहाची फर्माईश केली जाते. कधी काचेच्या ग्लासात तर कधी चीनीमातीच्या कपात आणि घराबाहेर असाल तर प्लास्टिकच्या कपमध्ये चहा आपल्या समोर येतो. प्लास्टिकमधील चहा हा तुमच्या जीवावर बेतू शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या बायो केमिस्ट्री विभागातील संशोधक प्रा. एस.पी.सिंह यांनी केलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे. प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात गरम पदार्थ टाकल्यानंतर त्यातून `बीस फिनॉल ए’ तयार होते. आणि ते खल्ल्यानंतर लोक नपुंसक होऊ शकतात. याबाबत उंदरावर प्रयोग करण्यात आले. यात अनेक आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत.
ज्या उंदरांना २१ दिवस `बीस फिनॉल ए’ देण्यात आले त्यांच्या स्पर्मची मात्रा कमी झाली. तसेच प्रजननानंतर सर्वसाधारण उंदरांच्या तुलनेत यांना होणाऱ्या पिलांची संख्या कमी झाली. एवढेच नाही तर उंदरांच्या गर्भधारणेतही अनेक समस्या निर्माण झाल्या.
प्लास्टिक निर्मूलन केले जावे यासाठी शासन-प्रशासन स्तरावर मोठे प्रयत्न सुरु आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थाही प्लास्टिकला विरोध करताना दिसतात. मात्र, अद्याप याचे निर्मूलन झालेले नाही. चहाच्या टपरीवर, ऑफिसमधील कँटीनमध्ये प्लास्टिक कपचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे चहा घेताना काळजी घेणे गरजेचे आहे. `बीस फिनॉल ए’ मुळे मधुमेह, मेंदूवर परिणाम, ह्रदय रोग यांचा धोका संभवतो, असे संशोधकांचे मत आहे.
`बीस फिनॉल ए’ एवढे धोकादायक आहे की, ते रक्तात मिसळते आणि त्यामुळे मधुमेहाची शक्यता बळावते. हे संपूर्ण संशोधन अमेरिकेच्या ऑफसेट बुकमध्ये प्रकाशित झाले आहे.