मुंबई : तुम्ही नियमित आणि चांगला आहार घेत नसाल तर तुमचे आरोग्य बिघडण्याचे हे एक कारण आहे. तसेच आहाराशी मधुमेहाचा थेट संबंध येतो. फास्ट फूडच्या नावाखाली अरबट-चरबट अनियमित आहार करत असाल तर मधुमेहाला आमंत्रणच मिळते.
मधुमेह झालेल्या व्यक्तींपैकी ७० टक्के रुग्णांचा आहार हा अनियमित असल्याचा अहवाल ‘अॅबॉट फूड, स्पाइक्स अॅण्ड डायबेटिस’ने सादर केलाय. मधुमेह झालेल्यांपैकी ४६ टक्के लोक हे स्थूल असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आलेय.
या सर्वेक्षणात ३६ ते ६५ वयोगटातील ४१०० मधुमेही रुग्णांची पाहाणी करण्यात आली. या सर्वांना अठरा महिन्यांपूर्वीच मधुमेह झाल्याचे स्पष्ट झाले होते. मधुमेह झालेल्यांपैकी ६२ टक्के लोक अतिवजन असलेले असून ४२ टक्के व्यक्तींचे वर्गीकरण स्थूल असे करण्यात आले आहे.
असंतुलीत आहारामुळे ६५ टक्के लोकांची रक्तशर्करा अनियंत्रित आहे. त्यांच्यामध्ये ६८ टक्के रुग्णांमध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणावर आढळली आहेत. भारतीय आहारात ग्लायकेमिकचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जेवणानंतर रक्तशर्करेचे प्रमाण मोजणे आवश्यक असते, असे इंडियन अकॅडमी ऑफ डायबेटिसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलेय.
दरम्यान, पॉलिश केलेले तांदूळ आरोग्याला घातक असल्याचे पुढे आलेय. सध्या पॉलिश केलेले तांदूळ खाण्याचे प्रमाण अधिक आहे. या तांदळात ४८ टक्के कॅलरीचे प्रमाण असते. रक्तात कर्बोदकांचे प्रमाण अधिक असल्यामागे हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे कमी कॅलरीज असलेले अन्न खाणेच योग्य असल्याचे डॉ. व्ही. मोहन यांचे म्हणणे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.