मुंबई: पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेद सांगतं. त्यानुसार पावसाळ्यातही आहाराचे विशिष्ट नियोजन असावं. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्यानं तसंच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्यानं आहाराचं योग्य नियोजन असायला हवं.
पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळं होणार्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला पडसं यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळं कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात. योग्य आहाराचं नियोजन केल्यास हे आजार आपण निश्चितच टाळू शकतो.
पाहा कसा असावा आहार -
> आषाढ, श्रावण, भाद्रपद या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळं शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
> मीठ आणि आंबट कमी असलेलं जेवण घ्यावं. लोणचे, चटणी, दही, अतितिखट या गोष्टी टाळायला हव्यात.
> उकडलेल्या भाज्या, पालेभाज्या न घेता फळभाज्यांवर भर द्यावा उदा. भोपळा, दुधी. आहारात मुगाची डाळ, खिचडी, मका या गोष्टी यायला हव्यात.
> हिरव्या पालेभाज्यांतून जंतुसंसर्गाची अधिक शक्यता असल्यानं या पालेभाज्या टाळाव्यात.
> भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत.
> जेवणात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या गोष्टी असाव्यात.
> पाणी उकळूनच प्यावं. त्याचप्रमाणे नॉनव्हेज शक्यतो टाळायला हवं. पूर्ण भूक लागल्याशिवाय खाऊ नये.
> पावसाळ्यात दुपारची झोप टाळावी. कारण यामुळं शरीरात अतिरिक्त पित्त वाढण्याची शक्यता असते.
केसांची काळजी घ्या
पावसाळ्यात केसांची निगाही अधिक महत्त्वाची आहे. या काळात दमटपणा अधिक असल्यानं केस तुटण्याचं, गळण्याचं प्रमाणही वाढतं. त्यामुळं शक्यतो स्ट्रेटनिंग, आयर्न करणं किंवा एखादं जेल लावणं या बाबी टाळाव्यात. केस धुतल्यानंतर ते योग्यरीत्या सुकतील याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणं केसांना कोमट खोबरेल तेलानं मॉलिश केल्यास होणारी हानी निश्चितच टळू शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.